वाहतुकीच्या नियमांची पायमल्ली

By Admin | Updated: November 2, 2016 00:43 IST2016-11-02T00:43:55+5:302016-11-02T00:43:55+5:30

गोळीबार चौकातून उमरी - येनगावकडे जाणाऱ्या मुख्य रस्त्यावर ठिकठिकाणी वाहने उभी असतात.

Traffic violation rules | वाहतुकीच्या नियमांची पायमल्ली

वाहतुकीच्या नियमांची पायमल्ली

विभागाचे दुर्लक्ष : वहिवाट झाली धोक्याची
कारंजा (घा.) : गोळीबार चौकातून उमरी - येनगावकडे जाणाऱ्या मुख्य रस्त्यावर ठिकठिकाणी वाहने उभी असतात. यामुळे वाहतुकीला अडथळा निर्माण झाला आहे. रस्त्यावरून पादचाऱ्यांना ये जा करणे कठीण झाले आहे. परिणामी, किरकोळ अपघात नित्याचेच झाले आहेत.
शहरातील वाहतूक सुरळीत ठेवण्याची जबाबदारी वाहतूक पोलिसांची आहे; पण ते या प्रकाराकडे दुर्लक्ष करीत रस्त्यावर वाहने उभी ठेवून वाहतूक रोखणाऱ्यांवर कारवाई करण्यास तयार नाही. यामुळे एखादा मोठा अपघात होऊन जीवित हानी झाल्यास जबाबदार कोण, असा प्रश्न उपस्थित होत आहे. या रस्त्यावरून १५ गावांतील नागरिक ये-जा करीत असतात. कारंजा गोळीबार चौकातून उमरी-येनगावकडे जाणाऱ्या मुख्य रस्त्यावर अनेक प्रकारची दुकाने आहेत. या दुकानांमध्ये येणारे ग्राहक राजरोसपणे दुकानांसमोर भररस्त्यावर वाहने उभी ठेवतात. यामुळे वाहतुकीची होणारी कोंडी ही बाब नित्याची झाली आहे. पायी चालणेही कठीण जात असल्याने अनेकदा अपघातही झाले आहेत.
दक्षता कमिटीच्या सभेमध्ये ठाणेदारांना अनेकवार या गंभीर समस्येची जाणीव करून देण्यात आली; पण अद्याप कोणतीही कारवाई वाहने वा वाहन चालकांवर झालेली नाही. एखादा मोठा अपघात झाल्यावर कारवाई करणार काय, असा प्रश्न नागरिक उपस्थित करीत आहेत.
दुकानदारही ग्राहकांना वाहने रस्त्यावर ठेवू नका, अशा सूचना देत नाहीत. परिणामी वाहतुकीची कोंडी होऊन वाहतूक धोक्याची झालेली आहे.(तालुका प्रतिनिधी)

१५ गावातील नागरिकांसाठी हाच रस्ता
कारंजा गोळीबार चौक हा शहरातील मुख्य चौक आहे. हा रस्ता आसपासच्या १५ गावांना जोडणारा आहे. त्यामुळे येथे नेहमीच वर्दळ असते; पण मार्गावरील दुकानांमध्ये खरेदीकरिता आल्यावर वाहनतळाची सोय नसल्याने कुठलाही विचार न करता वाहने रस्त्यावरच उभी केली जातात. यामुळे उर्वरित चिंचोळ्या मार्गावरून इतर वाहन चालकांना वाट काढावी लागते. परिणामी, अपघाताची दाट शक्यता निर्माण झाली आहे.

रस्त्यावर अपघाताचा धोका कायम
शहरातील मुख्य रस्ता असल्याने येथे वाहनांची वर्दळ असते. बसेसही याच मार्गाने ये-जा करतात. यामुळे वाहतुकीची कोंडी होऊन अपघाताचा धोका वाढला आहे. किरकोळ अपघात तर नित्याचेच झाले आहेत. शाळेत जात असलेल्या विद्यार्थ्यांनाही जीव मुठीत घेऊन या मार्गावरून जावे लागते. शहरातील वाहतूक सुरळीत ठेवण्याची जबाबदारी वाहतूक पोलिसांची आहे; पण ते या प्रकाराकडे दुर्लक्ष करीत रस्त्यावर वाहने उभी ठेवून वाहतूक रोखणाऱ्यांवर कारवाई करण्यास तयार नाही. यामुळे मोठा अपघात होऊन जीवित हानी झाल्यास जबाबदार कोण हा प्रश्न उपस्थित होतो.

Web Title: Traffic violation rules

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.