रेतीची अवैध वाहतूक दोन ट्रॅक्टरवर चोरीचा गुन्हा
By Admin | Updated: February 25, 2016 02:06 IST2016-02-25T02:06:00+5:302016-02-25T02:06:00+5:30
चिकणी व जामणी शिवारात कन्हान रेतीची अवैध वाहतूक करणाऱ्या दोन ट्रॅक्टरवर पोलिसांनी बुधवारी चोरीचा गुन्हा दाखल केला.

रेतीची अवैध वाहतूक दोन ट्रॅक्टरवर चोरीचा गुन्हा
सात जण अटकेत : नऊ लाखांचा माल जप्त
देवळी : चिकणी व जामणी शिवारात कन्हान रेतीची अवैध वाहतूक करणाऱ्या दोन ट्रॅक्टरवर पोलिसांनी बुधवारी चोरीचा गुन्हा दाखल केला. भादंविच्या कलम ३७९, ३४ अन्वये ही कारवाई करण्यात आली. पोलीस शिपाई योगेश वानखेडे व अनुप खेडकर यांच्या तक्रारीवरून दोन ट्रॅक्टर चालकांसह सात जणांवर अटकेची कारवाई करण्यात आली. या कारवाईत दोन ट्रॅक्टर, दोन ट्रॉली तसेच २८० फूट रेती असा ९ लाख रुपयांचा माल जप्त करण्यात आला.
पोलीस सूत्रानुसार, ट्रॅक्टर एम.एच. ३२ पी. २६९३ आणि एम.एच. ३२ ए. ७७४९ या दोन वाहनांच्या माध्यमातून कन्हान रेतीची अवैध वाहतूक करण्यात येत होती. याबाबत पोलिसांना माहिती मिळाली. ही रेती वर्धा येथून देवळी परिसरातील चिकणी व जामणी येथील ग्राहकाकडे जात होती. दरम्यान, पोलीस शिपाई वानखेडे व खेडकर यांनी ही वाहने मधेच अडवून कारवाई केली. या दोन्ही वाहनांवर कार्यरत अविनाश सुनील बुधबावरे, प्रवीण ज्ञानेश्वर गडकर, श्याम बापूराव ठाकरे, विजय मारोती मन्ने, संदीप मुन्नालाल अंबाडरे, गजानन दशरथ वाघ, राजू गुलाबराव पुसराम सर्व रा. सावंगी (मेघे) यांच्यावर अटकेची कारवाई करण्यात आली. पोलिसांच्या या कारवाईमुळे तालुक्यातील अन्य रेती चोरट्यांमध्ये धास्ती निर्माण झाली आहे.
कन्हान घाटावरून या रेतीची नियमानुसार वाहतूक करण्यात आली. ही रेती मोठ्या वाहनाने वर्धा मुक्कामी आणून एका ठिकाणी टाकण्यात आली. यानंतर ट्रॅक्टरच्या माध्यमातून ही रेती ग्राहकापर्यंत पोहोचवित असताना पोलिसांकडून चुकीच्या पद्धतीने गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती ट्रॅक्टर चालकांनी दिली.(प्रतिनिधी)