दुर्लक्षी कारभारामुळे वाहतुकीची कोंडी
By Admin | Updated: February 27, 2017 00:33 IST2017-02-27T00:33:19+5:302017-02-27T00:33:19+5:30
शहरातील बजाज चौक भागातील आचार्य विनोबा भावे उड्डाणपुलाच्या रुंदीकरणाचे काम सध्या सुरू आहे.

दुर्लक्षी कारभारामुळे वाहतुकीची कोंडी
बजाज चौकातील प्रकार : वरिष्ठांनी दखल घेण्याची गरज; नागरिकांना सहन करावा लागतो नाहक त्रास
वर्धा : शहरातील बजाज चौक भागातील आचार्य विनोबा भावे उड्डाणपुलाच्या रुंदीकरणाचे काम सध्या सुरू आहे. याच चौकात वाहतुकीची कोंडी होऊ नये म्हणून वाहतूक पोलिसांची नियुक्ती करण्यात आली आहे. परंतु, त्यांच्याकडून कामात कुचराई केल्या जात असल्याने या भागात नेहमीच वाहतुकीची कोंडी होते. रविवारी दुपारी येथे वाहतुकीची कोंडी झाली होती. जवळपास १ तास परिश्रम केल्यानंतर वाहतूक पोलिसांनी उड्डाणपुलावरील खोळंबलेली वाहतूक सुरळीत केली. येथे वाहतुकीची कोंडी होऊ नये म्हणून वरिष्ठांनी योग्य दखल घेण्याची गरज आहे.
शहरात वाढलेल्या वाहनांची संख्या व छोट्या-मोठ्या वाहनांच्या वाढलेल्या वर्दळीमुळे बजाज चौकातील आचार्य विनोबा भावे उड्डाणपुलाच्या रुंदीकरणाचे काम शासनाने हाती घेतले आहे. त्यासाठी शासनाचा मोठा निधी जिल्हा प्रशासनाला प्राप्त झाला आहे. उड्डाणपुलाच्या रुंदीकरणाचे काम युद्धपातळीवर पूर्ण करू असे लोकप्रतिनिधींकडून सांगितले जात असले तरी हे काम कासव गतीनेच सुरू असल्याची ओरड आहे. उड्डाणपुलाच्या रुंदीकरणाचे काम सुरू असताना येथे वाहतुकीची कोंडी होऊ नये म्हणून संबंधीतांनी नियोजनबद्ध कार्यक्रम आखून त्यावर कृती करणे क्रमप्राप्त होते. परंतु, वाहतुकीची कोंडी होऊ नये यासाठी योग्य नियोजन करण्यात आले नसल्याचा प्रत्यय रविवारी दुपारी बघावयास मिळाला.
रविवारी दुपारी १२.३० वाजताच्या सुमारास बजाज चौकात नेहमीप्रमानेच वाहतुकीची कोंडी झाली होती. परिणामी, यवतमाळकडून वर्धेत, हिंगणघाटकडून वर्धेत तर वर्धेतून हिंगणघाट व यवतमाळकडे जाणाऱ्यांना नाहक त्रास सहन करावा लागला. बजाज चौकात नेहमीच वाहतुकीची कोंडी होते. यावर मार्ग काढण्याकरिता प्रशासनाच्यावतीने अरूंद असलेल्या उड्डाण पुलाच्या रुंदीकरणाचे काम सुरू केले आहे. यामुळे येथे वाहतुकीची कोंडी होऊ नये यासाठी जिल्हा प्रशासनातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी योग्य पावले उचलत प्रभावी कार्यवाही करणे गरजेचे आहे.(शहर प्रतिनिधी)
मनमर्जीने केली जातात वाहने उभी
स्थानिक बजाज चौकात पालिका प्रशासनाच्यावतीने वाहनतळाची व्यवस्था करण्यात आली असली या परिसरात ठिकठिकाणी मनमर्जीने वाहने उभी केली जात आहेत. बजाज चौकातील काही परिसरात आॅटो स्टॅन्डची व्यवस्था करण्यात आली आहे. मात्र, बरेच आॅटोचालक इतरांची पर्वा न करता आपल्या ताब्यातील वाहन रस्त्यावरच उभे करून आॅटोत प्रवासी बसवतात. हा प्रकार अपघाताला निमंत्रण देणारा असून याकडे वाहतूक पोलिसांचेही दुर्लक्ष होत आहे. कर्तव्यावरील अनेक वाहतूक पोलीस चहा व पानटपरीवरच अर्धा अधिक वेळ घालवताना दिसत असल्याने याकडे वरिष्ठांनी लक्ष देण्याची गरज आहे.
बजाज चौकात मुख्य भाजी बाजार असून भाजी खरेदीसाठी नागरिकांची गर्दी होते. यातच रविवार असल्याने येथे होणारी गर्दी अधिक असते. सध्या बजाज चौकात वर्धा न. प. प्रशासनाने पे अॅन्ड पार्कची व्यवस्था केली आहे. मात्र, त्याचा वापर होत नसल्याचे येथे उभ्या असलेल्या वाहनांवरून दिसत आहे. याकडे वाहतूक पोलिसांनी लक्ष देणे गरजेचे आहे.
येथील बजाज चौक परिसरात आॅटोचालक व इतर वाहनचालक आपल्या ताब्यातील वाहने रस्त्याच्या कडेलाच उभी करतात. हा प्रकार मोठ्या अपघाता निमंत्रण देणारा ठरत आहे. याकडे वाहतूक पोलिसांचेही दुर्लक्ष होत आहे. परिणामी, संबंधीत वरिष्ठ अधिकाऱ्यांनी नागरिकांसह वाहनचालकांच्या या समस्येकडे लक्ष देणे आता गरजेचे आहे.
वाहतुकीची कोंडी होऊ नये म्हणून बजाज चौकात वाहतूक पोलिसांची नियुक्ती करण्यात आली आहे. अनेक आॅटोचालक व इतर वाहनचालक वाहतूक नियमांना येथे दररोज फाटाच देत असल्याचे बघावयास मिळते. त्यांच्या या अनागोंदी कारभाराकडे वाहतूक पोलिसही कानाडोळाच करीत असल्याने त्यांच्या कार्यप्रणालीवरच प्रश्न उपस्थित केले जात आहे.