रस्त्यात ट्रक फसल्याने वाहतूक ठप्प
By Admin | Updated: April 14, 2016 02:49 IST2016-04-14T02:49:54+5:302016-04-14T02:49:54+5:30
येथील आर्वी मार्गावर असलेल्या पुलाचे काम अर्धवट असल्याने येथे बुधवारी सकाळी रेतीची ओव्हरलोड वाहतूक करणारा ट्रक फसला.

रस्त्यात ट्रक फसल्याने वाहतूक ठप्प
दोन महिन्यांपासून पुलाचे काम थंडबस्त्यात : रस्त्यातच ट्रक रिकामा केल्याने अनेकांचे अपघात
वर्धा : येथील आर्वी मार्गावर असलेल्या पुलाचे काम अर्धवट असल्याने येथे बुधवारी सकाळी रेतीची ओव्हरलोड वाहतूक करणारा ट्रक फसला. ट्रक रस्त्याच्या मधोमध फसल्याने दोनही बाजूची वाहतूक ठप्प झाली होती. वाहतूक सुरळीत करण्याकरिता ट्रकमधील रेती रस्त्याच्या मधोमध रिकामी करण्यात आली. त्यावर घसरून पडल्याने येथे अनेकांना किरकोळ इजा झाली.
आर्वी मार्गावरील फरसाचा नाला म्हणून ओळख असलेल्या नाल्यावरील पुलाची उंची वाढविण्याचा प्रस्ताव आमदार विकास निधीतून मंजूर करण्यात आला. या कामाचे बांधकाम सार्वजनिक विभागाच्या अधिकारात देण्यात आले. बांधकामाचा निधी मंजूर झाल्याने आमदारांच्या हस्ते दीड महिन्यापूर्वी कामाचे भूमिपूजन करण्यात आले. पुलाचे एका बाजूचे खोदकाम करण्यात आले. याला आता दीड महिन्याचा कालावधी झाला. या खोदकामाव्यतिरिक्त पुलाचे दुसरे कुठलेही काम करण्यात आलेले नाही.
हा रस्ता वर्दळीचा असल्याने झालेल्या खोदकामामुळे अपघाताची शक्यता वर्तविण्यात आली असताना बुधवारी सकाळी येथे रेती भरला ट्रक फसला. रस्त्याच्या मधोमध ट्रक फसल्याने दोनही बाजुच्या वाहतुकीचा खोळंबा झाला होता. याची माहिती रामनगर पोलिसांना देताच ठाणेदार विजय मगर त्यांनी कर्मचाऱ्यांसह घटनास्थळ गाठले. यावेळी ट्रकचालकाकडून रेतीची रॉयल्टी तपासली असता त्यात दोन ब्रास रेतीची वाहतूक करण्याचा परवाना देण्यात आल्याचे दिसून आले. मात्र ट्रकमध्ये त्यापेक्षा अधिक रेती असल्याचे ठाणेदार विजय मगर यांनी सांगितले. याची माहिती त्यांनी तहसीलदार राहुल सारंग यांना दिली. यानंतर ट्रकमधील रेती तिथेच खाली करून वाहतूक सुरळीत करण्यात आली. मात्र रस्त्यावरच ट्रक खाली केल्याने त्यावरून घसरून अनेक जण किरकोळ जखमी झाले. या पुलाखालून दुरध्वनीच्या विविध कंपनीच्या लाईन गेल्या आहेत. त्याची कल्पना संबंधीत कंपनीला देण्यात आली असली तरी त्यांच्याकडून कारवाई झाली नसल्याने काम करण्याची अडचण जात आहे.(प्रतिनिधी)