अर्धवट रस्त्यामुळे वाहतूक धोक्यात

By Admin | Updated: June 14, 2015 02:26 IST2015-06-14T02:26:16+5:302015-06-14T02:26:16+5:30

हमदापूर ते सिंदी (रेल्वे) या सात ते आठ किमी आलगाव रस्त्याचे नुकतेच बांधकाम करण्यात आले;

Traffic hazard due to a partial road | अर्धवट रस्त्यामुळे वाहतूक धोक्यात

अर्धवट रस्त्यामुळे वाहतूक धोक्यात

वर्धा : हमदापूर ते सिंदी (रेल्वे) या सात ते आठ किमी आलगाव रस्त्याचे नुकतेच बांधकाम करण्यात आले; पण रस्त्याचे डांबरीकरण करताना ते तुकड्यांमध्ये करण्यात आले. यामुळे अद्यापही हा रस्ता पूर्ण झालेला नाही. सध्या पावसाळा सुरू झाल्याने अपूर्ण रस्त्यामुळे विद्यार्थ्यांसह प्रवाश्यांचे हाल होत आहेत. संबंधित विभागाने याकडे लक्ष देत कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.
हमदापूर ते सिंदी रेल्वे या रस्त्याचे आलगाव नजीक दोन किमीचे काम अपूर्ण आहे. शिवणगाव येथून दोन किमी रस्त्याचे बांधकाम करण्यात आले; पण उर्वरित रस्ता जैसे थे ठेवण्यात आला आहे. या रस्त्याने पायी चालणेही कठीण झाले आहे. हमदापूर येथून आलगाव, शिवणगाव, पहेलानपूर, पळसगाव, सिंदी (रेल्वे) जाणाऱ्या मार्गाची अत्यंत दुरवस्था झाली आहे. लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष होत असल्याने रस्त्याची दुरवस्था झाली आहे. याच रस्त्याने दहेगाव स्टेशन, तुळजापूर, चिंचोली येथील वाहतूकही होते; पण या रस्त्यावर खड्डे पडले आहेत. पावसाळ्यात खड्यांत पाणी राहत असल्याने अपघाताचा धोका निर्माण झाला आहे. आलगाव, शिवणगाव येथील विद्यार्थी हमदापूर येथे शाळेत जातात. त्यांनाही चिखलातून वाट काढावी लागते. बस सुरू करण्यासाठी वर्धा आगाराला अनेकदा निवेदने देण्यात आली; पण रस्ता खराब असल्याने बस गावात येत नाही. संबधित विभागाने याकडे लक्ष देत रस्त्याचे काम पूर्ण करणे गरजेचे झाले आहे.(कार्यालय प्रतिनिधी)

Web Title: Traffic hazard due to a partial road

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.