राज्य मार्गावर वाहतूक धोक्याची

By Admin | Published: May 8, 2017 12:38 AM2017-05-08T00:38:59+5:302017-05-08T00:38:59+5:30

सर्वाधिक रहदारीचा भार असलेले राज्यमार्ग सुस्थितीत असणे गरजेचे असते. सुस्थितीत म्हणजे केवळ रस्ता गुळगुळीत असून चालत नाही

Traffic Danger on State Road | राज्य मार्गावर वाहतूक धोक्याची

राज्य मार्गावर वाहतूक धोक्याची

googlenewsNext

झुडपे, दुकानांचे अतिक्रमण : बांधकाम विभागाची डोळेझाक
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : सर्वाधिक रहदारीचा भार असलेले राज्यमार्ग सुस्थितीत असणे गरजेचे असते. सुस्थितीत म्हणजे केवळ रस्ता गुळगुळीत असून चालत नाही तर रस्त्याच्या कडेला असलेली झुडपे कापलेली असणे तथा वाहने, दुकानांचे अतिक्रमण हटविणे गरजेचे असते; पण वर्धा ते यवतमाळ राज्य मार्गावर झुडपांसह वाहनांचेही अनेक ठिकाणी अतिक्रमण दिसते. यामुळे वाहतूक धोक्याची ठरत आहे.
वर्धा ते यवतमाळ राज्य मार्गावर सेलसुरा गावाजवळ रस्त्याच्या एका बाजूला मोठ्या प्रमाणात झुडपे वाढलेली आहे. रस्त्यापर्यंत असलेल्या या झुडपांमुळे वाहने रस्त्याच्या काठाने चालविणे धोक्याचे ठरत आहे. याच मार्गावर सेलसुरा ते सालोड दरम्यान अनेक ठिकाणी रस्त्याच्या दोन्ही कडेला वाहने उभी असतात. या वाहनांमुळे चालकांना सावधगिरी बाळगूनच आपली वाहने काढावी लागतात. शिवाय अनेक ठिकाणी रस्त्यापर्यंत दुकाने, घरे आहेत. सालोड येथे रस्त्यापर्यंत दुकाने असल्याने अपघाताचा धोका असतो. शिवाय प्रवासी निवारा, आॅटो स्टॅण्ड, नागरिकांची घरेही रस्त्यापर्यंत आहेत. यामुळे हा रस्ता वाहतुकीस अपुरा ठरत आहे. याच प्रकारामुळे सालोड ते सेलसुरा दरम्यान अनेकदा मोठे अपघात झाले आहेत. यात अनेकांना जीवही गमवावा लागला आहे. या प्रकाराकडे बांधकाम विभागाचे दुर्लक्ष होत असून ही बाब प्रवाशांच्या जीवावर बेतणारी ठरत आहे.

सालोड बायपास चौकातील रस्ता दुभाजक झाले रस्त्याला समांतर
नागपूर ते औरंगाबाद द्रुतगती मार्गाची निर्मिती करण्यात आली असता बायपास चौकांमध्ये रस्ता दुभाजकांची निर्मिती करण्यात आली होती. हे रस्ता दुभाजक अत्यंत ठेंगणे केल्याने त्यांची मोडतोड झाली आहे. वर्धा शहरातील दत्तपूर चौक, जुनापाणी चौक, सावंगी चौक तसेच सालोड चौकातील रस्ता दुभाजकही अत्यंत ठेगणे व मोडकळीस आलेले आहेत. सालोड चौकातील रस्ता दुभाजक तर वारंवार रस्ता दुरूस्तीमुळे रस्त्याला समांतरच झाल्याचे दिसून येत आहे. काही वर्षांपूर्वी या दुभाजकांची रंगरंगोटी कण्यात आली होती; पण सध्या दुभाजकांची दयनिय अवस्था झाली आहे. सालोड चौकातून सर्वाधिक अवजड वाहनांची वाहतूक होते. यामुळे या चौकात सुशोभित केलेले, रिफ्लेक्टर लावलेल्या उंच दुभाजकांची गरज आहे; पण या दृष्टिने प्रयत्न होत नसल्याचेच दिसून येत आहे.

वाहनांमुळे अपघाताची शक्यता
वर्धा ते यवतमाळ मार्गावरील देवळी ते वर्धा दरम्यान अनेक ठिकाणी रस्त्याच्या कडेला अवजड वाहने उभी केली जातात. हा प्रकार सेलसुरा ते सावंगी दरम्यान अधिक पाहावयास मिळतो. सालोड बायपास चौकामध्येही मोठी वाहने रस्त्याच्या कडेला उभी राहत असल्याने अपघाताचा धोका वाढला आहे. या रस्त्याच्या रूंदीकरणाचे काम प्रस्तावित आहे. असे असले तरी किमान रस्ता पूर्ण होईस्तोवर या प्रकारांवर आळा घालणे गरजेचे झाले आहे. रस्त्याच्या कडेला उभ्या राहणाऱ्या अवजड वाहनांमुळे वळणावर समोरून येणारी वाहने दिसत नाहीत. बांधकाम विभाग व पोलिसांनी याकडे लक्ष देत कार्यवाही करणे गरजेचे झाले आहे.

 

Web Title: Traffic Danger on State Road

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.