‘ते’ टॉवर ठरतेय विद्यार्थ्यांना धोक्याचे
By Admin | Updated: July 15, 2014 00:08 IST2014-07-15T00:08:03+5:302014-07-15T00:08:03+5:30
शहरातील तीन ले-आऊटच्या नागरिकांना परिणामकारक ठरू शकेल, अशा ठिकाणी एका खासगी कंपनीच्या ‘फोर जी’ टॉवरची उभारणी करण्यात आली आहे़ हे टॉवर नागरिकांसह विद्यार्थ्यांच्या आरोग्यास

‘ते’ टॉवर ठरतेय विद्यार्थ्यांना धोक्याचे
वर्धा : शहरातील तीन ले-आऊटच्या नागरिकांना परिणामकारक ठरू शकेल, अशा ठिकाणी एका खासगी कंपनीच्या ‘फोर जी’ टॉवरची उभारणी करण्यात आली आहे़ हे टॉवर नागरिकांसह विद्यार्थ्यांच्या आरोग्यास अपायकारक ठरणारे आहे़ यामुळे ते त्वरित हटविण्यात यावे, अशी मागणी नागरिकांनी केली आहे़ याबाबत जिल्हाधिकारी एऩ नवीन सोना यांना निवेदनही सादर केले आहे़
रोडे, माऊस्कर आणि सत्याश्रम मंडळ ले-आऊटमधील नागरिकांना राम मुडे यांच्या घराच्या अंगणात उभारले जात असलेले हे ‘फोर जी’ मोबाईल टॉवर धोकादायक ठरत आहे़ ‘क्लिनिकल जर्नल आॅफ न्युरालॉजी’ च्या निष्कर्षाने मेंदू व मज्जासंस्थेसाठी हे तंत्रज्ञान घातक आहे. ‘ग्रीन प्लॅनेट सोसायटी’नेही १२ जून २०११ रोजी राज्य व केंद्र शासनाला पत्र देत मोबाईल टॉवरच्या विकिरणांचा आरोग्यावर विपरित परिणाम होत असल्याने कडक निर्बंध घालण्याचे सूचविले होते.
केंद्र सरकार दूरसंचार विभागाने १ आॅगस्ट २०१३ रोजी मोबाईल टॉवर उभारण्याबाबत काही सूचना केल्या होत्या. त्यात चुंबकीय विकिरणांच्या अधिक उत्सर्जनावर निर्बंध घालण्यात आलेत़ टॉवर उभारले जाते, त्या मालकाचे ना-हरकत प्रमाणपत्र, ग्रा़पं़ वा नगर पालिकेची मंजूरी, आग प्रतिबंधक प्रमाणपत्र, विकिरण उत्सर्जन नियंत्रित असल्याचे प्रमाणपत्र आदी मार्गदर्शक सूचना दिल्या आहेत. महाराष्ट्र शासनाच्या नियमानुसार आता शाळा, रुग्णालय, वृद्धाश्रम, बालगृहांच्या १०० मीटर परिसरात वा रहिवासी परिसरात मोबाईल टॉवर उभारू नये, असे सुचविण्यात आले आहे. सर्व प्रमाणपत्रांशिवाय ७० टक्के शेजारी रहिवाशांचे ना-हरकत पत्र असावे, असेही सुचविण्यात आले आहे. या सर्व बाबींवर कोणत्याही नियमांची काळजी न करता राम मुडे यांच्या अंगणात हे टॉवर खासगी कंपनीतर्फे उभारण्यात आले आहे़
या टॉवरपासून ५० मीटरच्या आत आठ वर्षांपासून सत्य विद्या निकेतन कान्व्हेंट सुरू आहे. या कान्व्हेेंटमध्ये तीन ते सहा वर्षे वयोगटातील मुले शिक्षण घेतात़ शिवाय मराठी माध्यमाचे बाल संस्कार केंद्रही १० वर्षांपासून सुरू आहे. या टॉवरच्या बाजूलाच जिल्हा परिषदेची अंगणवाडी व प्राथमिक शाळा आहे़ टॉवरच्या विकिरणांमुळे परिसरातील नागरिकांना मुलांच्या आरोग्यावर विपरित परिणाम होण्याची भीती आहे़ प्रारंभी टॉवरचे काम सुरू होण्यापूर्वी सर्व शेतकऱ्यांना मच्छिीपालन करण्यासाठी मोठे तळे बांधण्याचे काम सुरू असल्याचे सांगण्यात आले़ कुणाच्या लक्षात येऊ नये म्हणून रात्रीच्या वेळेत ही कामे केलीत़ टॉवर उभे करीत असताना परिसरातील नागरिकांची परवानगीही घ्यावी लागते; पण येथे नागरिकांना अंधारात ठेवून टॉवर उभारण्यात आले आहे़ जिल्हा प्रशासनाने या संपूर्ण प्रकाराची दखल घेत टॉवर त्वरित हटवावे आणि सुरू असलेले काम थांबविण्यात यावे, अशी मागणी आहे़ याबाबत लोकप्रतिनिधींनाही निवेदन सादर केले आहे़(कार्यालय प्रतिनिधी)