पर्यटकांना सेलूचा बोर व्याघ्र प्रकल्प उघडण्याची प्रतीक्षा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 20, 2020 05:00 IST2020-07-20T05:00:00+5:302020-07-20T05:00:19+5:30
देशातील सर्वात छोटा व्याघ्र प्रकल्प अशी सेलू तालुक्यातील बोर व्याघ्र प्रकल्पाची ओळख. या ठिकाणी पट्टेदार वाघ, बिबट, हरिण, अस्वल, मोर आदी वन्यप्राणी आहेत. शिवाय येथे जंगल सफारीसाठी अनेक पर्यटक नेहमी येतात. परंतु, सध्या कोरोना संकटामुळे हा व्याघ्र प्रकल्प बंद आहे. २३ मार्च पासून बोर व्याघ्र प्रकल्प पर्यटकांसाठी बंद असल्याने पर्यटकांना जंगल सफारी करविणाऱ्या जिप्सी चालकांसह तेथील गाईडवर उपासमारीची वेळ आली आहे.

पर्यटकांना सेलूचा बोर व्याघ्र प्रकल्प उघडण्याची प्रतीक्षा
लोकमत न्यूज नेटवर्क
बोरधरण : बच्चेकंपनीसह अनेकांसाठी आकर्षनाचा केंद्र ठरणारा जिल्ह्यातील बोर व्याघ्र प्रकल्प कोरोना संकटामुळे सध्या लॉकडाऊन आहे. लॉकडाऊनमध्ये शिथिलता मिळाल्यावर चंद्रपूर जिल्ह्यातील ताडोबा व्याघ्र प्रकल्प पर्यटकांसाठी खुले करण्यात आले असले तरी अद्यापही सेलू तालुक्यातील बोर व्याघ्र प्रकल्प पर्यटकांसाठी खुला करण्यात आलेला नाही. त्यामुळे येथील गाईडसह जिप्सी चालकांवर सध्या उपासमारीची वेळ आली असून निसर्गप्रेमींसह वन्यजीव प्रेमींना बोर व्याघ्र प्रकल्प उघडण्याची प्रतीक्षा आहे.
देशातील सर्वात छोटा व्याघ्र प्रकल्प अशी सेलू तालुक्यातील बोर व्याघ्र प्रकल्पाची ओळख. या ठिकाणी पट्टेदार वाघ, बिबट, हरिण, अस्वल, मोर आदी वन्यप्राणी आहेत. शिवाय येथे जंगल सफारीसाठी अनेक पर्यटक नेहमी येतात. परंतु, सध्या कोरोना संकटामुळे हा व्याघ्र प्रकल्प बंद आहे. २३ मार्च पासून बोर व्याघ्र प्रकल्प पर्यटकांसाठी बंद असल्याने पर्यटकांना जंगल सफारी करविणाऱ्या जिप्सी चालकांसह तेथील गाईडवर उपासमारीची वेळ आली आहे. इतकेच नव्हे तर बोर व्याघ्र प्रकल्पाच्या परिसरात खाद्यपदार्थ विक्री करणाºया छोट्या व्यावसायिकांच्या आर्थिक अडचणीत भर पडली आहे. वन्यजीव प्रेमी तसेच छोट्या व्यावसायिकांची अडचण लक्षात घेऊन जिल्हा प्रशासनाने या प्रकरणी वेळीच योग्य कार्यवाही करण्याची मागणी आहे.
१७ जिप्सी चालकांच्या आर्थिक अडचणीत भर
सेलू तालुक्यातील बोर व्याघ्र प्रकल्पाच्या मुख्य प्रवेशद्वारावरील १६ तर अडेगाव येथील प्रवेश द्वारावरील एका जिप्सी चालकांच्या आर्थिक अडचणीत सध्या भर पडली आहे. मागील चार महिन्यांपासून आवकच थांबल्याने त्यांच्या कुटुंबावर उपासमारीची वेळ आली आहे. या चालकांची परिस्थिती लक्षात घेऊन योग्य कार्यवाहीची अपेक्षा आहे.
गाईडला रोजगार हमीचा आधार
बोर व्याघ्र प्रकल्पाच्या मुख्य प्रवेश द्वारावरील २५ तर अडेगाव येथील प्रवेशद्वारावरील सात गाईडला सध्या रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून रोजगार उपलब्ध करून दिल्या जात असल्याचे सांगण्यात येत आहे. असे असले तरी पूर्वीच्या तुलनेत सध्या आर्थिक मोबदला कमी मिळत असल्याची ओरड आहे.
पंधरा दिवसांपासून दुकान लावत आहो; पण ग्राहक नाही. पर्यटकांसाठी बोर व्याघ्र प्रकल्प सुरू न झाल्याने पर्यटकही येथे फिरकत नसल्याने आमच्या समोर रोजगाराचा प्रश्न उभा आहे. पर्यटकांसाठी बोर व्याघ्र प्रकल्प उघडल्यास परिस्थिती बदलेल असे वाटते.
- प्रकाश मेशरे, व्यावसायिक, बोरधरण.
पूर्वी कोरोना संकटामुळे तर आता पावसाळ्यामुळे बोर व्याघ्र प्रकल्प बंद आहे. गाईडला हंगामी मजूर म्हणून रोजगार हमी योजनेंतर्गत रोजगार उपलब्ध करून दिला जात आहे.
- नीलेश गावंडे, वनपरिक्षेत्र अधिकारी, बोर व्याघ्र प्रकल्प, बोरधरण.