आज प्रचारतोफा थंडावणार, आता कसोटी मतदारांची
By Admin | Updated: February 14, 2017 01:24 IST2017-02-14T01:24:23+5:302017-02-14T01:24:23+5:30
अवघ्या दोन दिवसांवर जिल्हा परिषद पंचायत समितीची निवडणूक होऊ घातली.

आज प्रचारतोफा थंडावणार, आता कसोटी मतदारांची
वर्धेतील १४ ही गटांमध्ये कमालीची चुरस : प्रचारातून आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी
वर्धा : अवघ्या दोन दिवसांवर जिल्हा परिषद पंचायत समितीची निवडणूक होऊ घातली. राजकीय दंगल चुरशीची होत असल्याचे प्रचाराच्या रणधुमाळीवरुन दिसून येते. कुठे सरळ, कुठे तिरंगी, तर कुठे बहुरंगी लढतीचे चित्र आहे. शेवटच्या दोन दिवसांत कोणता उमेदवार मतदारांवर अधिराज्य गाजवतो, याकडे जनतेचे लक्ष लागले आहेत. मंगळवारी रात्री १२ वाजता प्रचारतोफा थंडावणार आहे. यानंतर मूकप्रचाराला सुरुवात होणार आहे.
राजकीय फडावर सभांच्या माध्यमातून आरोप-प्रत्योपाच्या फैरी झडत आहे. काही उमेदवार विकास केला नसेल, तर मते देऊ नका, अशी साद थेट मतदारांना घालत आहे. काही उमेदवार आर्थिक जोरावर मते विकत घेण्याची रणनिती आखून आहे. अनेक ठिकाणी बंडखोरी झाली आहे. राजकीय पक्षानेही काही जागांवर गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या लोकांना तिकीट दिल्यामुळे मतदारांना या कसोटीतून जावे लागणार आहे.
वर्धा तालुक्यातील बोरगाव(मेघे) मतदार संघात भाजपने तिकीट विक्री केल्याची चर्चा आहे. यामुळे पक्षनिष्ठ चांगलेच दुखावलेले असून मोठ्या प्रमाणावर बंडखोरी झालेली आहे.
पिंपरी(मेघे) मतदार संघात काँग्रेसकडून भाजपाने डावलेला उमेदवार रिंगणात आहे. भाजपने जुन्या कार्यकर्त्याच्या माध्यमातून आव्हान दिले आहे. हा सर्वात मोठा मतदार संघ असल्यामुळे उमेदवारांची चांगलीच कसरत होत आहे. सिंदी(मेघे) गट कायम राखण्यासाठी राष्ट्रवादीने युवा उमेदवार रिंगणात उतरविला, तर भाजपने बाहेरचा चेहरा आयात केला आहे. स्थानिक मुद्यावरुन प्रचार शिगेला पोहचला आहे.
सावंगी (मेघे) मतदार संघात भाजपने विद्यमान जि.प. उपाध्यक्षाच्या रुपाने दिग्गज उमेदवार दिला आहे, तर हे आव्हान पेलण्यासाठी काँग्रेस आणि बसपाने दारू किंग व सट्टा किंग मैदानात उतरविले आहे. ही बाब सदर उमेदवारांनी प्रतिज्ञापत्रात कबुलही केली आहे. यातील एका उमेदवाराने तर भ्रष्टाचाराचे गुन्हे लपवून निवडणूक आयोगाला अंधारात ठेवल्याची चर्चाही या मतदार संघात आहे.
नालवाडी गटात खुद्द पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी भाजप उमेदवार निश्चित केला आहे. त्यांची प्रतिष्ठा कायम राखण्याचे आव्हान भाजपचे खासदार व आमदारांपुढे आहे. पालकमंत्र्यांनी तेथे जाहीर सभाही घेतली. वरुड गटात भाजपाचे माजी जिल्हाध्यक्ष डॉ. शिरीष गोडे यांनी भांडून आपल्या समर्थकासाठी भाजपची तिकीट मिळविली आहे. त्यांची येथे कसोटी आहे. तरोडा मतदार संघात काँग्रेसने कडवे आव्हान उभे केले आहे. भाजप आणि शिवसेनेतील मतविभाजणी कुणाच्या पथ्यावर पडते. हे बघण्यासारखे आहे. सेवाग्राम गटात भाजपने रिपाइं (ए) साठी ही जागा सोडली. येथे शिवसेना व राकॉ, काँग्रेस, बसप व अपक्षाचे आव्हान आहे.
तळेगाव(टा.) मतदार संघात विशिष्ट समाजाच्या मतांवर डोळा ठेवून राजकीय पक्षांनी आपले उमेदवार रिंगणात उतरिले. येथे एकमेव अपक्ष उमेदवाराने पक्षीय उमेदवारांची झोप उडविली आहे.
सालोड(हिरापूर) गटात भाजपपुढे बंडखोर उमेदवारांचे आव्हान आहे. येथील स्थानिक रहिवाश्याचा मुद्दा प्रचारात पुढे आल्यामुळे निवडणुकीची रंगत वाढली आहे. वायगाव(नि.) गटात प्रतिमांवर निवडणूक गाजत आहे. स्वच्छ प्रतिमा आणि डागाळलेली प्रतिमा हा प्रचाराचा मुद्दा बनलेला आहे. यावरुन काँग्रेस आणि भाजपात चांगलीच जुंपली आहे.
पवणार गट क्षेत्रफळाने मोठा आहे. मतदारांपर्यंत पोहचण्यासाठी उमेदवारांची कसरत बघायला मिळत आहे. प्रमुख पक्षाचे उमेदवार अद्यापही काही मतदारांपर्यंत पोहचू न शकल्यामुळे वेगळीच चुरस बघायला मिळत आहे. आंजी(मोठी) गटात खुद्द मुख्यमंत्र्यांनी प्रचार सभा केल्यामुळे अन्य पक्षांच्या उमेदवारांना चांगलीच झुंज द्यावी लागणार आहे. वायफड गटात काँग्रेसने माजी जि.प. सदस्यांच्या पत्नीला रिंगणात उतरविले आहे, तर राकाँने माजी वर्धा नगराध्यक्षाच्या रुपाने आव्हान उभे केले आहे. भाजपनेही कडवे आव्हान दिले असून शिवसेनेने चुरस वाढवली आहे.
मतदार राजा या सर्व घडामोंडीवर बारीक लक्ष ठेवून आहेत. येत्या १६ फेब्रुवारीला मतदान यंत्रातून काय निकाल देतात, यावरच उमेदवारांचे भवितव्य ठरणार आहे.(जिल्हा प्रतिनिधी)
वाठोडा व मोरांगणा येथे पाच जणांची माघार
आर्वी- तालुक्यात दुसऱ्या टप्प्यात होणाऱ्या वाढोडा व मोरांगणा या गट व गणात सोमवारी अखेरच्या दिवशी पाच उमेदवारांनी नामांकन परत घेतले. यात जि.प. गटात कॉँग्रेसच्या सुचिता अश्वीन शेंडे, भाजपाच्या हिना देवेंद्र कदम तर काचनूर पं.स. मध्ये मारोती चवरे, मोरांगणा पं.स. पुष्पलता पुरी व कुंदा झोड यांनी आपले नामांकन परत घेतले आहे. भाजपाच्यावतीने दोन तर कॉँग्रेसच्यावतीने दोन नामांकन दाखल केले होते. यापैकी प्रत्येकी एक-एक नामांकन अखेरच्या दिवशी मागे घेण्यात आहे. दोन्ही गटात २९ उमेदवार रिंगणात आहे. कॉँग्रेसच्या सुचिता शेंडे यांना वेळेवर नामांकन परत घण्यास लावल्याची चर्चा काँग्रेसच्या गोटात आहे.
निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या सूचनांकडे उमेदवारांची पाठ
वर्धा : जिल्हा परिषद व पंचायत समितीकरिता मतदान प्रक्रीया पारदर्शी व्हावी, याकरिता शासनाच्यावतीने विविध प्रयत्न करण्यात येत आहे. यातच सील केलेले कोणते इव्हीएम कोणत्या केंद्रावर जाणार याची माहिती उमेदवारांना व्हावी याकरिता निवडणूक विभागाच्यावतीने तसे संदेश उमेदवारांच्या भ्रमणध्वनीवर पाठविले. मात्र वर्धा तालुक्यातील एकही उमेदवार या कामाकरिता आले नसल्याची माहिती निवडणूक विभागाकडून देण्यात आली आहे.
वर्धा तालुक्यातील १४ गट व २८ गणांकरिता निवडणूक होत आहे. यात जिल्हा परिषदेकरिता रविवारी इव्हीएम सील करण्यात आले. यावेळी उमेदवाराच्या प्रतिनिधीची उपस्थिती होती. त्यांच्या समक्षच इव्हीएम सील करण्यात आले. या मशिन्स सध्या क्रीडा संकुलात सुरक्षित ठेवण्यात आल्या आहेत. मशिन्स सील केल्यानंतर त्या कोणत्या केंद्रातील याची घेण्याकरिता उमेदवारांना तसे संदेश त्यांच्या मोबाईलवर पाठविण्यात आले आहे. मात्र त्यांच्याकडून कोणताही प्रतिसाद मिळाला नसल्याची माहिती आहे. स्वत: उमेदवार व त्याचा कुठलाही प्रतिनिधी येथे उपस्थित झाला नाही.
सोमवारी २८ पंचायत समितीकरिता मशिन्स सील करण्यात आले. यावेळीही उमेदवारांना त्याची माहिती देण्याकरिता सूचना करण्यात आली होती. येथेही त्यांच्याकडून विशेष सहकार्य मिळाले नसल्याची माहिती आहे. वर्धेत पालिका निवडणुकीत इव्हीएमध्ये मोठ्या प्रमाणात घोळ झाल्याची ओरड झाली होती. अशी ओरड या निवडणुकीत होणार नाही, याची दक्षता घेण्याकरिता ही पद्धत अवलंबिल्याची माहिती निवडणूक विभागाकडून देण्यात आली आहे.(प्रतिनिधी)
माहिती देण्याकरिता दोन कर्मचारी
उमेदवार व त्यांच्या प्रतिनिधींना ही माहिती देण्याकरिता निवडणूक कार्यालयात खास दोन कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांच्याकडून माहिती पुरविण्याची तयारी असताना येथे कोणीच आले नाही.