वयोवृद्ध जोडप्यावर भीक मागण्याची वेळ
By Admin | Updated: June 1, 2016 02:34 IST2016-06-01T02:34:38+5:302016-06-01T02:34:38+5:30
दारिद्र्यरेषेखाली येत असलेल्या एका जोडप्याचे नाव यादीत नसल्याने त्याच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न उपस्थित झाला आहे.

वयोवृद्ध जोडप्यावर भीक मागण्याची वेळ
शासनाच्या योजना कुचकामी : निराधार असूनही आधार नाही
अरविंद काकडे आकोली
दारिद्र्यरेषेखाली येत असलेल्या एका जोडप्याचे नाव यादीत नसल्याने त्याच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न उपस्थित झाला आहे. त्याला शासनाच्यावतीने कुठलीही मदत मिळत नाही. परिणामी त्यांना भीक मागून आपले पोट भरण्याची वेळ आली आहे. यामुळे या वृद्ध दाम्पत्याला शासकीय मदत देण्याची मागणी जोर धरत आहे.
निराधार व वृद्धांना आधार देण्याकरिता शासनाच्यावतीने श्रावणबाळसह अनेक योजना राबविण्यात येत आहेत. हा लाभ घेण्याकरिता त्यांच्याकडून काही निकष देण्यात आले आहेत. या निकषाप्रमाणे निराधार योजनेचा लाभार्थी दारिद्र्यरेषेखालील असणे अनिवार्य आहे. असे असताना केवळ यादीत नाव नसल्याने येथील एका दाम्पत्यावर उपासमारीची वेळ आली आहे. गावात राहून परिसरात फिरून भीक मागून जगण्याची वेळी येथील बलदेव अमरजीत वेधानी (७५) व पत्नी सुगंधी (७०) या जोडप्यावर आली आहे. त्यांचे वास्तव्य सध्या आकोली (हेटी) या गावात आहे. त्यांना राहायला धड घर नाही की, शेतीवाडी नाही तरीही त्यांचे दारिद्र्यरेषेखालील यादीत नाव नाही.
या दाम्पत्याने निराधार योजनेतून लाभ मिळावा याकरिता दोन-तीन वेळा अर्ज केले, पण प्रत्येकवेळी अर्ज नामंजूर झाला. यामुळे हतबल होवून शेवटी त्यांनी लाभ मिळण्याकरिता आवश्यक प्रयत्न सोडले व हातात भिक्षेची झोळी घेतली. दररोज सकाळी जामनी, मवाळा, तामसवाडा, सुकळी (बाई) यापैकी एका गावात जाऊन भिक्षा मागायची. मिळेल तिथे भाकरतुकडा खाऊन घर गाठायचे व परत दुसऱ्या दिवशी दुसरे गाव गाठायचे. असा या दाम्पत्याचा दिनक्रम आहे. या दाम्पत्याला गरज असताना शासनाचे निराधार योजनेतून मदत देण्याची गरज आहे. त्यांना शासनाची मदत मिळाली तर त्यांना जगण्याचे बळ मिळेल. सेलूचे तहसीलदार डॉ. रवींद्र होळी यांनी विशेष बाब म्हणून त्यांना श्रावण बाळ योजनेचा लाभ देणे गरजेचे आहे.