आकोली : फेब्रुवारी महिन्यात कापणी झालेल्या ऊसाचे चुकारे शेतकऱ्यांना अद्याप मिळाले नाहीत़ यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत़ त्वरित चुकारे देण्यात यावे, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे़जामणी येथील महात्मा सहकारी साखर कारखाना पूर्ती उद्योग समूहाने घेतला. यामुळे आशा पल्लवीत झालेल्या शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात ऊसाची लागवड केली़ ऊसाची कापणीही करण्यात आली; पण चुकारे देण्यात आले नाहीत़ ऊसाचा पैसा आज-उद्या येईलच, असे वाटत असताना शेतकऱ्यांना अद्याप चुकारे मिळाले नाहीत़ यामुळे शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती अधिकच बिकट झाली आहे़ संपलेल्या गळीत हंगामात शेतकऱ्यांनी आशेने पूर्ती साखर कारखान्याला ऊस दिला़ फेब्रुवारीत विकलेल्या ऊसाची निम्मी रक्कमही शेतकऱ्यांच्या हातात पडली नाही़ दररोज शेतकरी चुकाऱ्याकरिता कारखान्यात जातात व आश्वासन घेऊन घरचा रस्ता धरतात़ तरोड्याचा युवा शेतकरी प्रमोद चांभारे यांनी सुमारे १५० टण ऊस साखर कारखान्याला दिला़ फेबु्रवारी महिन्यात ऊसाची कापणी झाली़ अधिकाऱ्यांची वारंवार भेट घेतली़ मुलांच्या शाळा प्रवेशाचे कारण सांगितले, तेव्हा जूनमध्ये ९४ हजार रुपये दिले़ उर्वरित रकमेकरिता चकरा मारणे सुरू आहे. पूर्तीच्या प्रशासनाने शेतकऱ्यांची आर्थिक अडचण लक्षात घेत थकित चुकारे देणे गरजेचे आहे़(वार्ताहर)
पाच महिन्यांपासून थकले ऊसाचे चुकारे
By admin | Updated: July 7, 2014 23:43 IST