सौर ऊर्जेवर चालणार अपंगांची तीन चाकी सायकल
By Admin | Updated: October 14, 2015 02:08 IST2015-10-14T02:08:13+5:302015-10-14T02:08:13+5:30
तंत्रज्ञान सामान्यांपर्यंत पोहोचणार नाही, समाजहिताचे संशोधन होत नाही, तोपर्यंत डिजिटल इंडियाची संकल्पना पुर्णत्वास येऊ शकत नाही.

सौर ऊर्जेवर चालणार अपंगांची तीन चाकी सायकल
बा.दे. अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांनी विकसित केले तंत्रज्ञान
वर्धा : तंत्रज्ञान सामान्यांपर्यंत पोहोचणार नाही, समाजहिताचे संशोधन होत नाही, तोपर्यंत डिजिटल इंडियाची संकल्पना पुर्णत्वास येऊ शकत नाही. ही बाब लक्षात घेत सेवाग्राम येथील बापूराव देशमुख अभियांत्रिकी महा.च्या मेकॅनिकल इंजि. शाखेतील विद्यार्थ्यांनी सौर ऊर्जेवर चालणारी अपंगांची तीन चाकी सायकल विकसित केली आहे.
प्रचलित तीन चाकी सायकल ही एका हातात हॅण्डल तर दुसऱ्या हाताने पॅडल मारून चालवावी लागते. पायाने चालता येत नाही व हाताने पॅडल मारल्याने वेदना होतात. खांद्यालाही दुखणे येते, अशी अपंगांची व्यथा आहे. याचा अभ्यास करून सायकल विकसित करण्याची कल्पना सुचली. सद्यस्थितीत असलेल्या सायकलमध्ये काय सुधारणा करता येईल, याबाबत एक डिझाईन तयार केले. अभ्यासांती सायकल बनविण्यास प्रारंभ केला. मोटरसायकल प्रमाणे हॅण्डल बसविले. यात एका हातात ब्रेक तर दुसऱ्या हातात एक्सलेटर देण्यात आले. सोबतच लाईटची सुविधा देण्यात आली. मागील भागात ५२ ए.एच. ची डिसी मोटर बसविण्यात आली. वर बसविलेल्या सौर ऊर्जा प्रणालीने बॅटरी चार्जींग होत राहील. बॅटरी सुस्थितीत राहावी म्हणून चार्ज कंट्रोलर लावण्यात आले. बॅटरी डिसचार्ज वा ओवरचार्ज होणार नाही. सूर्यप्रकाश असला तर सायकल कितीही तास चालू शकेल; पण सूर्यप्रकाश नसल्यास किमान तीन तास चालेल एवढी बॅटरी चार्ज राहील व ४० किमीपर्यंत सायकल सहजरित्या चालेल. ही सायकल अपंगांना उपयोगी ठरेल.(कार्यालय प्रतिनिधी)
अपंगांकरिता वरदान
सदर सायकलची २० किमी प्रती तास एवढी वेगमर्यादा बांधण्यात आली आहे. अपंग व्यक्तींना सहज सुलभ व्हावे, अशी सायकलची निर्मिती आहे. उन्ह, पावसापासून संरक्षण व्हावे म्हणून छत आहे. अपंगांना सहज बसता येईल, अशी बैठकव्यवस्था आहे. अपंगांच्या सूचना लक्षात घेत प्रात्यक्षिकासह सायकलला अंतीम रूप देण्यात आले.
सदर सायकल प्रा. आर.जे. डहाके प्रकल्प मार्गदर्शनात अभिजीत कडू, अनूप पहाडे, गणेश शिद, गौरव मोरे, हर्षल झाडे, एन. इंगोले, निखिल वानखेडे व परेश राऊत या विद्यार्थ्यांनी विकसित केली आहे. ही सायकल अपंगांना वरदान ठरणार आहे.