तीन हजार लिटर केरोसीन जप्त
By Admin | Updated: April 28, 2016 01:53 IST2016-04-28T01:53:26+5:302016-04-28T01:53:26+5:30
दोन वेगवेगळ्या ठिकाणी पोलिसांनी धाड मारून ३ हजार लिटर केरोसीन, ड्रम व कॅनसह एक लाख ५३ हजारांचा मुद्देमाल जप्त केला.

तीन हजार लिटर केरोसीन जप्त
तिघांना अटक : दीड लाखांचा मुद्देमाल ताब्यात, हिंगणघाट पोलिसांची कारवाई
हिंगणघाट : दोन वेगवेगळ्या ठिकाणी पोलिसांनी धाड मारून ३ हजार लिटर केरोसीन, ड्रम व कॅनसह एक लाख ५३ हजारांचा मुद्देमाल जप्त केला. ही कारवाई हिंगणघाट पोलिसांनी मंगळवारी रात्री केली. याप्रकरणी सत्यजित हिंमतराव खानदे, राजू सदाशीव तळवेकर आणि नाझीर पीर मोहंमद या तिघांना अटक करण्यात आली. या प्रकरणाच्या सखोल चौकशीसाठी आरोपींना पोलीस कोठडी देण्यात आली आहे. जिल्ह्यात सर्वत्र रॉकेलची टंचाई आहे. गरिबांना रॉकेल मिळत नाही. त्यामुळे एवढा मोठा साठा आला कुठून असे अनेक प्रश्न यामुळे प्रशासनापुढे निर्माण झाले आहे.
प्राप्त माहितीनुसार, तालुक्यात १३० केरोसीन परवानाधारक विक्रेते आहेत. महिन्याला ३५ हजार २४० लिटर केरोसीन चा कोटा आहे. यापैकी १० हजार लिटर केरोसीनची ४० परवाना धारकांच्या नावाने अर्ध घाऊक विक्रेते आर.आर. केला यांच्याकडून मंगळवारी उचल करण्यात आली. हा माल दोन ठिकाणी असल्याची माहिती हिंगणघाट पोलिसांना मिळाली. त्या आधारे ठाणेदार निलोत्पल यांच्या मार्गदर्शनाखाली पीएसआय विजय नाईक, हेडकॉन्स्टेबरल रामदास, प्रकाश इंगोले, एनपीसी विरेंद्र, अरविंद येनुरकर, ऋषी घंगारे, दीपक जंगले, निरंजन वरभे, सुधीर पांजळे यांच्या पथकाने मंगळवारी रात्री ८.३० वाजताच्या दरम्यान संत ज्ञानेश्वर वॉर्डातील सत्यजित हिंमतराव खानदे (४५) व राजू सदाशीव तळवेकर (३४) यांच्याकडे धाड टाकून १८०० लिटर केरोसीन, ड्रम व कॅनसह ७९ हजारांचा माल जप्त केला. त्यानंतर रात्री १२.३० वाजताच्या दरम्यान शिवाजी वॉर्डातील राका हॉस्पिटलच्या मागे एका घरातून ड्रमसह १२०० लिटर केरोसीन असा ५४ हजाराचा माल जप्त केला. यावेळी नाझीर पीर मोहंमद यास ताब्यात घेण्यात आले.
याप्रकरणी हिंगणघाट पोलिसांनी अत्यावश्यक वस्तु अधिनियम कायदा व कलम ५९७/१६/३, ७ (१) (ए) (२) अन्वये सत्यविजय खानंदे, राजू तळवेकर, रा. संत ज्ञानेश्वर वॉर्ड हिंंगणघाट व नाझीर पीर मोहंमद (३७) रा. शिवाजी वॉर्ड, हिंगणघाट या तिघांना अटक केली. सदर जप्त केरोसीन कोठून आणले. ते कोणाच्या परवान्याचे आहे. त्या केरोसीनची घाऊक विक्रेत्याकडून कोणी व कशी उचल केली यासाठी त्यांच्या स्वाक्षऱ्या व इतरही तपास करणे गरजेचे आहे. त्यामुळे या तीनही आरोपींना ३ मे पर्यंत पोलीस कोठडी देण्याची मागणी हिंगणघाट पोलिसांनी न्यायालयात केली होती.(तालुका प्रतिनिधी)
दोन आरोपींना ३० एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी
केरोसीन प्रकरणी सत्यजित हिंमतराव खानंदे आणि राजू सदाशीव तळवेकर या दोघांना हिंगणघाट पोलिसांनी न्यायालयात बुधवारी हजर केले असता ३० एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली. पण नाझीर पीर मोहंमद याला प्रकृती अस्वास्थ्यामुळे जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यामुळे पोलिसांना त्याची पोलीस कोठडी मिळाली नाही. या तिघांच्या बयानानंतरच खरे सत्य समोर येणार असे सांगण्यात येत आहे.
यासंदर्भात जिल्हा पुरवठा अधिकारी बी. यू. काळे यांच्याशी संपर्क साधून अधिक माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न केला असता बाहेरगावी असल्याचे सांगण्यात आले. नागरिकांना जीवनावश्यक वस्तुंचा पुरवठा योग्य प्रकारे होत नसल्याच्या तक्रारी वाढत आहे. त्यातच अधिकारी वर्ग उदासीन धोरण स्वीकारत असल्याने नागरिकांद्वारे आश्चर्य आणि संताप व्यक्त होत आहे.
केरोसीन आले कुठून
ग्राहकांना म्त्यांच्या हक्काचे केरोसीन वेळेवर मिळत नसल्याची ओरड नेहमीच होते असते. त्यातच एकाच रात्री दोन ठिकाणच्या कारवायांत जवळपास २४०० लिटर केरोसीन जप्त करण्यात आले. त्यामुळे सदर केरोसीन आले कुठून हा प्रश्न उपस्थित होत आहे. सदर केरोसीन काळ्याबाजारातील असून अनेक दिवसांपासून हा प्रकार सुरू असल्याचा संशय व्यक्त होत आहे.