थ्री-फेज वीज पुरवठा अनियमित

By Admin | Updated: November 23, 2014 23:24 IST2014-11-23T23:24:28+5:302014-11-23T23:24:28+5:30

शेतकऱ्यांना सिंचन सुविधेत खंड पडू नये म्हणून भारनियमनाच्या वेळांचे नियोजन करण्यात आले आहे; पण कधी ओव्हरलोड तर कधी ब्रेकडाऊनमुळे शेतकऱ्यांचे सिंचन प्रभावित होत आहे़

Three-phase power supply irregular | थ्री-फेज वीज पुरवठा अनियमित

थ्री-फेज वीज पुरवठा अनियमित

अंतोरा फिडरमधील प्रकार : १० तास वीज पुरविण्याची मागणी
आष्टी (श़) : शेतकऱ्यांना सिंचन सुविधेत खंड पडू नये म्हणून भारनियमनाच्या वेळांचे नियोजन करण्यात आले आहे; पण कधी ओव्हरलोड तर कधी ब्रेकडाऊनमुळे शेतकऱ्यांचे सिंचन प्रभावित होत आहे़ हा प्रकार अंतोरा फिडरमध्ये अधिक घडत असल्याने लहानआर्वी येथील शेतकऱ्यांना त्रास सहन करावा लागत आहे़ महावितरणने याकडे लक्ष देत कारवाई करावी, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे़ याबाबत सहायक अभियंत्यांना निवेदन देण्यात आले़
गत काही दिवसांपासून थ्री-फेज वीज पुरवठा अनियमित झाला आहे़ यामुळे शेतकऱ्यांच्या सिंचनाचे तीनतेरा झाले आहेत़ थ्री-फेज वीज पुरवठ्याची वेळ सोमवार ते गुरूवारी सकाळी ७.४५ वाजेपर्यंत असून शुक्रवार ते रविवार सकाळी १०.४५ ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत आहे़ यात कधी ओव्हरलोड तर कधी ब्रेकडाऊन होत असल्याने सिंचन तसेच शेतकऱ्यांचा जीव धोक्यात आला आहे़ शेतकऱ्याला पुरेपूर वीज पुरवठा मिळत नाही. यामुळे सिंचन सुविधा असताना कोरडवाहू शेती करण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे़ निसर्गाचा लहरीपणा व शासनाचे ढीसाळ धोरण यामुळे शेतकरी हवालदिल झाले आहे़
यंदा सोयाबीनची नापिकी झाली़ एकरी उत्पादन अत्यल्प आले़ कपाशीवर लाल्या व अन्य रोगांचे आक्रमण झाले़ यामुळे शेतकऱ्यांची आर्थिक घडी विस्कटली आहे़ यात वीज बिल भरणे कठीण आहे. वीज पुरवठा असाच अनियमित राहिला तर आत्महत्येशिवाय पर्याय नाही, असेही शेतकऱ्यांनी निवेदनात नमूद केले आहे़ २३० अ‍ॅम्पियर वीज पुरवठा गरजेचा असताना केवळ १३० अ‍ॅम्पियर पुरविला जातो़ यामुळे ओलितही होत नाही आणि शेतकऱ्यांचे मोटर पंपही नादुरूस्त होतात़ अनेक शेतकऱ्यांच्या मोटारी यामुळे जळाल्या आहेत़ हा प्रकार टाळण्याकरिता दहा तास थ्री-फेज वीज पुरवठा देण्यात यावा, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे़ सात दिवसांच्या आत अर्जाचा विचार न झाल्यास लहानआर्वी सर्कलच्यावतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल, असेही निवेदनात नमूद केले आहे़ निवेदन सादर करताना लहानआर्वी येथील पीडित शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते़(प्रतिनिधी)

Web Title: Three-phase power supply irregular

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.