बिल भरणा केंद्रातील अपहारप्रकरणी तिघांना अटक
By Admin | Updated: May 9, 2015 02:00 IST2015-05-09T02:00:11+5:302015-05-09T02:00:11+5:30
येथील वीज बिल भरणा केंद्रातील २० लाख ४४ हजारांची संगणमताने अफरातफर करण्यात आली.

बिल भरणा केंद्रातील अपहारप्रकरणी तिघांना अटक
हिंगणघाट : येथील वीज बिल भरणा केंद्रातील २० लाख ४४ हजारांची संगणमताने अफरातफर करण्यात आली. या प्रकरणी पोलिसात तक्रार करण्यात आली होती. या तक्रारीवर झालेल्या चौकशीअंती हिंगणघाट पोलिसांनी तिघांना बुधवारी अटक केली.
वीज भरणाकेंद्रातील कर्मचारी अभिकांत पचारे (२१) रा. इंदिरा गांधी वॉर्ड, संदीप तरोडकर (३२) रा. चिकमोह तसेच अभिकांतचा मित्र प्रशांत उराडे (२३) रा. खंडोबा वॉर्ड अशी अटकेत असलेल्यांची नावे आहेत.
प्राप्त माहितीनुसार, विद्युत क्षेत्र तांत्रिक कामगार सहकारी पत संस्थेला येथील ग्रामीण वीज बिलाच्या भरणा केंद्राचा कंत्राट मिळाला होता. त्यानुसार गत ३-४ वर्षांपासून शात्री वॉर्ड उड्डाण पुलापलिकडे बिल भरणा केंद्र सुरू होते. या केंद्रातील कर्मचाऱ्यांनी २ ते २३ मार्च २०१५ च्या कालावधीत वीज ग्राहकांकडून वसुल केलेल्या बऱ्याच बिलांची रक्कम वीज मंडळाच्या खात्यात भरली नाही. याची वीज मंडळाच्या अधिकाऱ्यांना जाणीव होताच त्यांनी चौकशी केली असता एकूण २० लाख ४४ हजार ३४५ रुपयांची अफरातफर झाल्याचे निदर्शनात आले. याची सूचना तांत्रिक पतसंस्थेच्या पदाधिकाऱ्यांना देवून हिंगणघाट पोलिसात अतिरिक्त कार्यकारी अभियंता मोरेश्वर सिरसे यांनी तक्रार दिली. यावरून पोलिसांनी दखल घेवून या संस्थेचे अध्यक्ष रमेश सायंकार यांना अटक केली होती. त्यामुळे व्यथित झालेल्या सायंकार यांनी खऱ्या गुन्हेगारांना शोधून काढण्याची मागणी केली होती. यात दीड महिन्यानंतर याप्रकरणी पोलिसांनी अभिकांत पचारे, संदीपा तारोडेकर व प्रशांत उराडे या तिघांना अटक केली. या प्रकरणातील आरोपी अभिकांत पचारे व प्रशांत उराडे मित्र असून अभिकांतने रक्कमेपैकी बरीच रक्कम प्रशांतला ट्रॅक्टर विकत घेण्यासाठी तसेच शेतीसाठी दिल्याचे व काही रक्कम लोटोमध्ये खर्च केल्याची माहिती त्यांनी पोलिसांना दिली आहे. २० लाखांच्या घोटाळ्याप्रकरणी हिंगणघाट पोलिसांनी भादंविच्या ५०६, ४०८, ४२० अन्वये गुन्हा दाखल केला असून उपनिरीक्षक नाईक यांनी अटकेची कारवाई केली आहे. या प्रकरणातील आरोपीच्या बयानाची सत्यता तपासून यातील रक्कम कोणाकोणाला देण्यात आली याचाही तपास करण्यात येणार असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे. (तालुका प्रतिनिधी)