तीन हत्यांचा उलगडा तर एकातील आरोपी फरारच
By Admin | Updated: March 30, 2017 00:44 IST2017-03-30T00:44:03+5:302017-03-30T00:44:03+5:30
पुलगाव पोलीस ठाण्यांतर्गत एकाच महिन्यात हत्येच्या चार घटना घडल्या. यातील तीन हत्यांचा उलगडा झाला

तीन हत्यांचा उलगडा तर एकातील आरोपी फरारच
एकाच महिन्यात पुलगाव ठाण्यांतर्गत चार हत्या
वर्धा : पुलगाव पोलीस ठाण्यांतर्गत एकाच महिन्यात हत्येच्या चार घटना घडल्या. यातील तीन हत्यांचा उलगडा झाला असून चपराशाच्या मारेकऱ्यांचा अद्याप शोध लागला नाही.
पांडे हत्येतील चौथा आरोपी जेरबंद
दखनीफैल भागातील सचिन महादेव पांडे (३०) याची २० मार्चला हत्या झाली. यात पुलगाव पोलिसांनी चार जणांविरुद्ध गुन्हा नोंदविला. घटनेच्या दिवशी तीन आरोपींना अटक केली; पण सलमान फरार होता. बुधवारी पोलिसांनी त्यालाही अटक केली. मद्यशौकीन सचिन पांडे २० मार्चला रात्री सलमानच्या गाडीवर बसला. यातून वाद होऊन सलमानसह शेख नासिर शेख इस्माईल (३०), अलताफ अली बक्श बब्बु अली बक्श (२७) व टिपू उर्फ अमीर खान मुमताज खान (२४) सर्व रा. पुलगाव यांनी त्याला लोखंडी रॉडने मारून ठार केले. यातील तीनही आरोपी न्यायालयीन कोठडीत आहे.
बहिणीच्या आत्महत्येचा घेतला बदला
अशोकनगर येथील शशांक प्रशांत करवाडे (२५) याची डॉ. आंबेडकरनगर येथील अल्पेश सदानंद टेंभुर्णे याने चाकूने वार करून हत्या केली. ही घटना २७ मार्चला दुपारी घडली. यातील आरोपीला पोलिसांनी धामणगाव (रेल्वे) येथून अटक केली. बहिनीच्या आत्महत्येचा बदला घेण्यासाठी अल्पेशने शशांकची हत्या केल्याचे पोलीस तपासात उघडकीस आले. अल्पेशची बहीण मयूरी हिने आत्महत्या केली होती. यात शशांक करवाडे व त्याच्या आई-वडिलांविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याबाबत गुन्हा दाखल होता. या प्रकरणी न्यायालयाने तिन्ही आरोपींची निर्दोष मुक्तता केली. तेव्हापासून तो बहिणीच्या आत्महत्येचा बदला घेण्याच्या तयारीत होता, असे तपासात समोर आले. पोलिसांनी गुन्ह्यातील चाकू व इतर साहित्य जप्त केले. पुलगाव पोलीस ठाण्यांतर्गत ९ ते २७ मार्चपर्यंत चार हत्यांचा तपास ठाणेदार मुरलीधर बुराडे व विवेक बन्सोड करीत आहे.(शहर प्रतिनिधी)
शिपायाचा मारेकरी फरार
न.प. च्या आयएम शाळेत चपराशी म्हणून कार्यरत युवराज बाळकृष्ण रामटेके याची हत्या १९ मार्चला सकाळी उघड झाली. पोलिसांनी अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला; पण तपासात उलगडा झाला नाही. शिवाय यातील मारेकरीही अद्याप फरार आहे.
न्यायालयीन कोठडी
इंझाळा येथील संजय व नत्थूजी होले या बाप-लेकाच्या ९ मार्च रोजी घडलेल्या हत्येप्रकरणी महादेव बरडे या आरोपीला न्यायालयीन कोठडी दिली आहे.