आयटीआयमधील चोरीप्रकरणी तिघे अटकेत
By Admin | Updated: February 15, 2016 02:11 IST2016-02-15T02:11:41+5:302016-02-15T02:11:41+5:30
हनुमान टेकडी परिसरात असलेल्या शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील एका खोलीतून मोठ्या प्रमाणात साहित्य लंपास झाले होते.

आयटीआयमधील चोरीप्रकरणी तिघे अटकेत
भंगार व्यावसायिकाचा समावेश : ४८ हजारांचा मुद्देमाल जप्त
वर्धा : हनुमान टेकडी परिसरात असलेल्या शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील एका खोलीतून मोठ्या प्रमाणात साहित्य लंपास झाले होते. या प्रकरणी तपासात स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी दोन महिलांसह साहित्याची खरेदी करणाऱ्या भंगार व्यावसायिकालाही अटक केली आहे. अटकेतील चोरट्यांकडून ४८ हजार १८० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
मोना सातपुते (२५) व अनिता जाधव (३०) दोन्ही रा. वडार झोपडपट्टी आर्वी नाका या दोघींसह भंगार विक्रेता संजय रमेश बोरे (३६) रा. गौरक्षण वॉर्ड याला अटक करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली.
येथील औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत २३ जानेवारीपूर्वी गोदामाची खिडकी तोडून अज्ञात चोरट्याने ड्रील मशीन, वेल्डींग रॉड, वजने, प्रेशर रेग्युलेटर आॅक्सीजन, इलेक्ट्रीकल बॉक्स व इतर साहित्य एकूण १ लाख ७ हजार ४२० रुपयांचे साहित्य चोरीला गेल्याची तक्रार प्राचार्य देवानंद गायधनी रा. नाचगणाव यांनी पोलिसात दिली. रामनगर पोलिसांनी यावरून भादंविच्या कलम ४५४, ४५८, ३८० अन्वये गुन्हा दाखल केला होता.
सदर गुन्ह्याचा तपास सुरू असताना स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी संशयावरून मोना व अनिता या दोन महिलांना ताब्यात घेतले. त्यांना विचारणा केली असता त्यांनी चोरीची कबुली असून त्यांच्याजवळून पाच हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला. उर्वरित साहित्य त्यांनी भंगार विक्रेता संजय बोरे याला विकल्याचे सांगितले. त्याला ताब्यात घेत त्याच्याजवळून इतर साहित्य जप्त केले असून आरोपींना रामनगर पोलिसांच्या स्वाधीन केले आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक अंकीत गोयल, अपर पोलीस अधीक्षक स्मिता पाटील, पोलीस निरीक्षक एम.डी. चाटे, यांच्यासह सहायक उपनिरीक्षक अशोक वाट, बालवाल, दिवाकर परिमल, अमर लाखे, समीर कडवे, आनंद भस्मे, संचाली मुंगुले, शिल्पा राऊत व चालक भुषण पुरी यांनी केली. (प्रतिनिधी)