जनावरांवर वाघाच्या हल्ल्याने दहशत
By Admin | Updated: February 5, 2015 23:15 IST2015-02-05T23:15:00+5:302015-02-05T23:15:00+5:30
हमदापूर शिवारात वाघाने हल्ला करून एक वासरू ठार केले़ ही घटना गुरूवारी (दि़५) उघडकीस आली़ यामुळे शेतकऱ्यांमध्ये भीती निर्माण झाली आहे़

जनावरांवर वाघाच्या हल्ल्याने दहशत
सेवाग्राम : हमदापूर शिवारात वाघाने हल्ला करून एक वासरू ठार केले़ ही घटना गुरूवारी (दि़५) उघडकीस आली़ यामुळे शेतकऱ्यांमध्ये भीती निर्माण झाली आहे़
हमदापूर येथील दशरथ महादेव देवतळे यांचे बोंडसुला मार्गावर हमदापूर शिवारात शेत आहे. शेतातच त्यांची बैलजोडी, गाय, गोऱ्हे आणि वासरू असते. गुरूवारी पहाटेच्या सुमारास निलेश देवतळे हा झाडझूड करण्यासाठी शेतात गेला असता जनावरे घाबरलेली आणि एक वर्षाची कालवड दिसली नाही. शोध घेतला असता ५० किमीच्या जवळपास झुडपाकडे वासराचे मुंडके नसलेले धड दिसून आले. हे पाहून वाघानेच हल्ला केला असावा, या शंकेने घाबरून त्याने घर गाठले़ याबाबतची माहिती पोलीस पाटील अतुल कांबळे, उपसरंच संजय देशमुख, जि.प. पशुचिकित्सालय केंद्राचे पशुधन विकास अधिकारी डॉ. अरुण भानसे यांना दिली. डॉ. भानसे घटनास्थळाची पाहणी केली असता वाघानेच शिकार हल्ला करून कालवड ठार केल्याचे सांगितले. त्या ठिकाणी वाघाच्या पंजाचे निशाणही आढळून आले़
हमदापूर सर्कलमधील ही चवथी घटना आहे. चानकी येथील मनीष तुपकर यांच्या एका दोन वर्षांच्या गोऱ्ह्याला वाघाने २९ एप्रिल रोजी ठार केले़ वसंता राऊत रा. कोपरा यांच्या संकरीत गाईला ३ एप्रिल रोजी मारले. भैय्याजी लांबट रा़ चानकी यांची जर्सी जातीच्या कालवडीवर २ मे रोजी हल्ला करून ठार केले़ वघाळ्याचे माजी पं़स़ सभापती श्रीराम तुमडाम यांना त्यांच्या परिसरात वाघाचे दर्शन झाले. २०१४ मध्ये तीन ठिकाणी वाघाने हल्ला केल्याने ग्रामस्थांत धास्ती आहे़ ही चवथी घटना आहे़ वाघाचे वास्तव्य निश्चित झाल्याने शेतातील कामे थांबली आहेत़(वार्ताहर)