७०० अभंगांवर लिहिले १ हजार ४४१ पानांचे भाष्य
By Admin | Updated: July 30, 2015 02:00 IST2015-07-30T02:00:27+5:302015-07-30T02:00:27+5:30
अध्यात्मक साधनेत गत चार दशकांपासून रममान झालेल्या स्वामी विवेकानंद वॉर्डातील हभप मधुकर बालाजी रघाटाटे यांनी तुकाराम महाराजांच्या...

७०० अभंगांवर लिहिले १ हजार ४४१ पानांचे भाष्य
तुकाराम महाराजांचा गीतार्थ बोधिनी अभंग : मधुकर रघाटाटे महाराज यांचे योगदान
हिंगणघाट : अध्यात्मक साधनेत गत चार दशकांपासून रममान झालेल्या स्वामी विवेकानंद वॉर्डातील हभप मधुकर बालाजी रघाटाटे यांनी तुकाराम महाराजांच्या आजपर्यंत अप्रसिद्ध असलेल्या गीतेवरील भाष्य असणाऱ्या ‘गीतार्थ बोधिनी’ च्या ७०० अभंगांवर मराठीतून भाष्य करणारा ग्रंथ लिहून काढला. या भाषांतराकरिता त्यांना अडीच वर्षांचा कालावधी लागला. १ हजार ४४१ पानांचा हा ग्रंथ नुकताच साकारला गेला आहे.
संतश्रेष्ठ तुकाराम महाराजांची गीतार्थ बोधिनी सध्याच्या काळात कोणत्याही प्रकाशनाद्वारे प्रसिद्ध झाली नसल्याची शक्यता अनेक अध्यात्म क्षेत्रातील अभ्यासकांनी व्यक्त केली आहे. हभप रघाटाटे महाराजांनी गीतार्थ बोधिनीच्या अभ्यासात रममान होत अकोला येथील चतुर महाराजांनी लिहिलेल्या एका ग्रंथातून गीतार्थ बोधिनी ही अभंग रूपात शोधून काढली. त्याचे सोप्या शब्दात निरूपण शब्दबद्ध करून संत साहित्याच्या अभ्यासकांना एक नवे दालन उपलब्ध करून दिले आहे.
हभप रघाटाटे यांचा पिंडच अध्यात्म साधना प्रवण आहे. हा वारसा त्यांना त्यांचे आजोबा हभप पांडुरंग रघाटाटे महाराज यांच्याकडून मिळाला. ईश्वरार्पित जीवन जगलेल्या त्यांच्या आजोबांनी येथील जुन्या वस्तीतील निशानपुरा वॉर्डात दत्तात्रेय मठ स्थापन केला. त्यांच्या निर्वाणानंतर ही परंपरा त्यांचे पुत्र स्व. बालाजी रघाटाटे यांनी सांभाळली. सध्या ही गुरूपरंपरा मधुकर रघाटाटे महाराज सांभाळत आहे. जेमतेम दहावीपर्यंत शिक्षण झालेले रघाटाटे यांनी शेती करीत मुखी नाम, हाती काम, हा अध्यात्मरंग जोपासला. त्यांनी गृहरक्षक दलातही सेवा दिली. १९९२ मध्ये महापूर आला. त्यावेळी जाम ते चंद्रपूर मार्गावरील खांबाडा या पुलावर अडकलेल्या १६ नागरिकांना त्यांनी सुखरूप बाहेर काढले. त्याच्या कामाची दखल घेत भारत सरकारने त्यांना राष्ट्रपती पुरस्काराने गौरविले. पुरात अडकलेले सर्व प्रवासी राजस्थानचे होते. तेथील एका कंपनीचे वरिष्ठ अधिकारी एस.के. पारीख यांनी आपल्या गावी पोहोचल्यावर रघाटाटे महाराजांना प्रशस्तीपत्र पाठवून त्यांचा गौरव केला होता. लोकसेवा हाच अध्यात्माचा दृगोचर होणारा साधनाक्रम आहे, असे ते मानतात.(तालुका प्रतिनिधी)
अधिक मासात झाला ग्रंथ पूर्ण
ज्ञानेश्वरी, तुकाराम महाराजांची गाथा, संत नामदेव महाराजांसह संत कबीर तसेच विविध संत साहित्याचा त्यांचा अभ्यास आहे. ते याबाबत जनप्रबोधनही करतात. गीतार्थ बोधिनी शिवाय त्यांनी संत एकनाथ, विशुद्धानंद महाराज, हैबती महाराज, हस्तमलक चरित्र, ज्ञानदीप आणि हरिपाठावर स्वतंत्र निरूपण हस्तलिखित तयार केले आहे; पण ते प्रसिद्ध झालेले नाही. संत तुकारामांच्या जीवनकार्याचा अभ्यास करीत असताना तुकारामांनी लिहिलेली गीतार्थ बोधिनी त्यांच्या हाती लागली. तिचे वाचन करताना मराठीतून निरूपण करण्याची प्रेरणा मिळाली. ११ एप्रिल २०१३ गुढीपाडव्याला त्यांनी लिखाण सुरू केले तर २६ जून २०१५ रोजी अधिकमास पर्व काळात १ हजार ४४१ पानांचा ग्रंथ लिहून पूर्ण केला. संतांच्या कृपाप्रसादाने हे निरूपण पूझे झाल्याचे ते प्रांजळपणे मान्य करतात.