‘त्या’ मुलांचे होणार पुन्हा शवविच्छेदन
By Admin | Updated: May 2, 2015 00:09 IST2015-05-02T00:09:50+5:302015-05-02T00:09:50+5:30
तालुक्यातील धावसा(हेटी) येथील मोरेश्वर वझरकर (१२) व शैलेश करणाके (१४) या दोघांच्या मृत्यू प्रकरणाने वेगळे वळण घेतले आहे.

‘त्या’ मुलांचे होणार पुन्हा शवविच्छेदन
संशय: पाण्यात बुडून नाही तर विजेच्या धक्क्याने मृत्यू
कारंजा (घाडगे): तालुक्यातील धावसा(हेटी) येथील मोरेश्वर वझरकर (१२) व शैलेश करणाके (१४) या दोघांच्या मृत्यू प्रकरणाने वेगळे वळण घेतले आहे. त्यांचा मृत्यू पाण्यात बुडून नाही तर त्याची हत्या करण्यात आल्याचा आरोप त्यांच्या वडिलांनी केला आहे. त्यांच्या तक्रारीवरून या दोघांचे पुन्हा शवविच्छेदन करण्याचे आदेश आर्वीचे उपविभागीय अधिकारी एम.आर.चव्हाण यांनी दिले. शिवाय जिल्हा शल्य चिकित्सकांनी घटनास्थळावर जात शवविच्छेदन करावे असे आदेशात नमूद आहे. सोबतच कारंजाचे नायब तहसीलदार व पोलीस निरिक्षकांनी प्रेत पुरलेल्या जागी जात पंचनामा करण्याचे आदेशात म्हटले आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, मोरेश्वर व शैलेश या दोघांचा मृतदेह २४ मार्च २०१५ रोजी गावालगतच्या पाझर तलावात आढळून आला. दोघांचा मृत्यू पाण्यात बुडून मृत्यू झाल्याचा अंदाज वर्तविण्यात आला होता. मृतकांच्या पालकांनी त्यावेळी कोणताही संशय दर्शविलेला नव्हता. त्यामुळे त्यांच्यावर शवविच्छेदन करून पालकांनी अंत्यसंस्कार केले. मात्र त्याचा मृतदेह मिळण्यापूर्वी पालकांनी दाखल केलेल्या तक्रारीनुसार नोंदविलेल्या बयानानुसार मृतकांचे वडील व नातेवाईकांचे म्हणने नोंदविण्यात आले. यात मुलांच्या मृत्यूबाबत संशय दर्शविलेला आहे. त्यांच्या बयानानुसार दोन्ही मुले विद्युत करंटने मरण पावल्याची चर्चा असल्याचे बोलले जात आहे. तसा अर्ज मृतकाच्या वडिलांनी कारंजा पोलिसात दिला आहे. या अर्जानुसार ३ मार्च २०१५ रोजी धावसा (हेटी) येथील कृष्णा बरखडे यांच्या शेतातील धुऱ्यावर असलेल्या तारांत विद्युत प्रवाह असून त्यांच्या स्पर्शाने या दोघांचा मृत्यू झाला. पुरवा नष्ट करण्याकरिता दोघांचे प्रेत तलावात टाकल्याचे म्हणने आहे; मात्र ग्रामीण रुग्णालयाच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांनी शवविच्छेदन अहवालात दोन्ही मुलांचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याचे नमूद केले आहे. यात संशय व्यक्त होत असल्याने दोन्ही मुलांचे पुन्हा शवविच्छेदन करून गुन्ह्याचा तपास करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. या प्रकरणाचा तपास झाल्यानंतर काय ते सत्य समोर येईल. याकडे साऱ्यांचे लक्ष आहे. (शहर प्रतिनिधी)