‘त्या’ आरोपींना पोलिसांचे अभय
By Admin | Updated: January 15, 2015 22:56 IST2015-01-15T22:56:52+5:302015-01-15T22:56:52+5:30
मुलाच्या हत्या प्रकरणातील मुख्य आरोपींच्या अटकेसाठी मागील सहा महिन्यांपासून भटकंती करणाऱ्या आईला न्याय मिळत नाही. यामुळे न्यायाच्या प्रतीक्षेत असलेल्या या मातेने पोलीस

‘त्या’ आरोपींना पोलिसांचे अभय
मृतकाच्या आईचा आत्महत्येचा इशारा : प्रशांत नारनवरे हत्या प्रकरण
देवळी : मुलाच्या हत्या प्रकरणातील मुख्य आरोपींच्या अटकेसाठी मागील सहा महिन्यांपासून भटकंती करणाऱ्या आईला न्याय मिळत नाही. यामुळे न्यायाच्या प्रतीक्षेत असलेल्या या मातेने पोलीस प्रशासनाच्या विरोधात आत्महत्येचे शस्त्र उगारले आहे़
तालुक्यातील सैदापूर येथील प्रशांत नारनवरे याला गंभीर मारहाण केल्याने ७ जुलै २०१४ रोजी त्याचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला होता. एकुलत्या एका मुलाची हत्या झाल्याने न्याय मिळावा म्हणून आई मंदा उत्तम नारनवरे (५०) यांनी जिल्हाधिकारी, पोलीस महासंचालक, गृहराज्यमंत्री, मुख्यमंत्री व लोकशाही दिनात तक्रारी करूनही अद्याप आरोपी मोकाटच आहे. तक्रारीची दखल घेतली जात नसल्याने आत्महत्या करावी लागेल, अशी भूमिका मुलाच्या आईने घेतली आहे. याबाबत खासदार रामदास तडस यांना निवेदनातून साकडे घातले आहे.
हत्या प्रकरणातील चार आरोपींना अटक केली. मात्र मुख्य आरोपी मोकाटच असल्याने मंदा नारनवरे यांनी वेळोवेळी देवळी पोलीस स्टेशन, जिल्हा पोलीस अधीक्षक, उपविभागीय अधिकारी यांना निवेदन दिले. गावातील अंतर्गत वाद व महिला बचत गटातील आर्थिक गैरव्यवहारातून ही हत्या करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे़ या प्रकरणातील आरोपी सुनिल पोरताके, अंकुश पोरताके, प्रशांत पोरताके व अंकुश नारनवरे या चार आरोपीला अटक केली़ घटनेतील मुख्य आरोपी भैय्या चोरे, शैलेश चोरे व पुरूषोत्तम ठाकरे अद्यापही मोकाट आहे़ आरोपीकडून धमकावणी केली जात असल्याचे गृहराज्यमंत्री राम शिंदे यांच्या दिलेल्या निवेदनात म्हटले आहे. मंत्रीमहोदयांनी आरोपीला अटक करण्याचा आदेश दिला. यानंतरही कोणतही कारवाई झालेली नाही. अखेर न्याय न मिळाल्यास आत्महत्येचा इशाराच प्रशांतच्या आईने शासन व प्रशासनाला दिला आहे.(प्रतिनिधी)