यंदा कापसाने चांगलाच खाल्ला भाव; आता खरीपात पेराही वाढणारच राव!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 16, 2022 05:00 IST2022-05-16T05:00:00+5:302022-05-16T05:00:01+5:30
आनंद इंगोले लोकमत न्यूज नेटवर्क वर्धा : कोरोनाकाळात कापूस विक्रीसाठी शेतकऱ्यांना अडचणींचा सामना करावा लागल्याने कपाशीची लागवड कमी करून ...

यंदा कापसाने चांगलाच खाल्ला भाव; आता खरीपात पेराही वाढणारच राव!
आनंद इंगोले
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : कोरोनाकाळात कापूस विक्रीसाठी शेतकऱ्यांना अडचणींचा सामना करावा लागल्याने कपाशीची लागवड कमी करून शेतकऱ्यांनी सोयाबीनचे क्षेत्र वाढविले. यावर्षी कपाशीने चांगलाच भाव खाल्ला असून १५ हजार रुपये क्विंटलच्या घरात भाव मिळत असल्याने येत्या खरीपामध्ये शेतकऱ्यांकडून कपाशीची लागवड वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे गेल्यावर्षीच्या तुलनेत यंदा कृषी विभागाकडून कपाशीच्या वाढीव क्षेत्राचे नियोजन करण्यात आले आहे.
खरीप हंगामाची तयारी सुरू झाली असून शेतीची मशागत अंतिम टप्प्यात आहे. मान्सूनही आठ ते दहा दिवस आधी धडकणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तविला असून कृषी विभागानेही खरीप हंगामाच्या पेरणीचे नियोजन केले आहे. यावर्षी ४ लाख ३७ हजार २२१ हेक्टरवर खरीपाचे नियोजन असून यामध्ये कपाशी, सोयाबीन, तूर व ज्वारी हीच पिके अनुक्रमे आघाडीवर आहेत. गेल्यावर्षी ४ लाख ४२ हजार ७७३ हेक्टरवर पेरणीचे नियोजन केले होते. त्यापैकी ४ लाख १८ हजार ५६१ हेक्टरवर प्रत्यक्ष लागवड झाली होती. यावरूनच यंदाच्या खरीपाचे नियोजन करण्यात आले आहे. गतवर्षी कपाशीचे २ लाख ४ हजार २०३ हेक्टरवर नियोजन करण्यात आले होते. परंतु प्रत्यक्षात २ लाख १६ हजार ५५५ हेक्टरवर कपाशीची लागवड केली होती. हाच अंदाज विचारात घेऊन कृषी विभागाने मागील वर्षीपेक्षा यावर्षी नियोजनात वाढ केली आहे.
डिझेलच्या दरवाढीमुळे यांत्रिक खर्चात वाढ
- मागील काही महिन्यांत पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कमालीची वाढ झाली आहे. त्यामुळे ट्रॅक्टरच्या सहाय्याने शेतीची मशागत करण्याच्या खर्चात बऱ्यापैकी वाढ झाली आहे. परिणामी शेतकरी बैलजोडीचा आधार घेत असल्याचे दिसून येते.
यावर्षी खरीप हंगामाच्या पेरणीचे नियोजन करण्यात आले आहे. गेल्यावर्षी २ लाख ४२ हजार २०३ हेक्टरवर नियोजन होते. परंतु प्रत्यक्ष ४ लाख १८ हजार ५६१ हेक्टरवर लागवड करण्यात आली होती. यावर्षी ४ लाख ३७ हजार २२१ हेक्टरचे नियोजन करण्यात आले आहे. आवश्यक खतसाठा व बियाण्यांची मागणी करण्यात आली असून शेतकऱ्यांनी काळजीपूर्वक खते व बियाण्यांची खरेदी करुन त्याच्या पावत्या जवळ ठेवाव्यात. कुठेही बोगसपणा आढळून आल्यास कृषी कार्यालयाकडे तक्रार करावी.
- अनिल इंगळे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी.