चोरट्याने ऐवज परत ठेवला
By Admin | Updated: November 17, 2014 22:58 IST2014-11-17T22:58:22+5:302014-11-17T22:58:22+5:30
डेहनकर ले-आऊट येथे भर दिवसा घडलेल्या जबरी चोरीने शहरात चांगलीच दहशत पसरली होती. या चोरीला आज सात दिवसांचा कालावधी होत आहे. चोरीतील आरोपीच्या शोधात पोलीस असताना

चोरट्याने ऐवज परत ठेवला
पोलीसही अवाक् : डेहणकर ले-आऊट येथील चोरीला वेगळेच वळण
वर्धा : डेहनकर ले-आऊट येथे भर दिवसा घडलेल्या जबरी चोरीने शहरात चांगलीच दहशत पसरली होती. या चोरीला आज सात दिवसांचा कालावधी होत आहे. चोरीतील आरोपीच्या शोधात पोलीस असताना सोमवारी कधी नव्हे असा प्रकार घडला. ही चोरी करणाऱ्या चोरट्याने लंपास केलेला ऐवज एका प्लास्टिकच्या पिशवीत जसाचा तसा आणून घरात टाकल्याने सारेच अवाक् झाले.. चोराच्या या कृत्याने पोलिसही विचारात पडले आहेत. यावरुन सदर चोरी प्रकरण नव्या वळणावर आले आहे.
११ नोव्हेंबर रोजी डेहनकर ले-आऊट येथील किशोर आकेल्ला यांची पत्नी घरी एकटी असताना सकाळी १०.३० वाजताच्या सुमारास त्यांच्या घरात दोन चोरट्यांनी चोरी केली. यावेळी आकेल्ला यांच्या पत्नीला मारहाण करून एका खुर्चीला बांधून ठेवले होते. चोरट्यांनी त्यांच्या घरातून हाती येईल तेवढा ऐवज घेवून पळ काढताना घरातील महिलेला घरातच बांधून ठेवले होते. याची माहिती असापासच्या परिसरात होताच नागरिकांनी त्यांच्या घराचे दार काढून पाहणी केली असता महिला दु:खात विव्हळत होती. नागरिकांनी याची माहिती शहर पोलिसांना दिली. पोलिसांनी घटनास्थळ गाठून पाहणी करून महिलेला उपचारार्थ जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल केले. तिच्यावर उपचार केल्यानंतर पोलिसांनी तक्रारीवरून गुन्हा दाखल केला.
भरदिवसा झालेल्या या चोरीमुळे नागरिकांत चांगलीच दहशत पसरली असल्याने पोलिसांनी चोरांचा पाठलाग करणे सुरू केले. या चोराचा सुगावा लागल्याची चर्चा पाहाता पाहता शहरात पसरली. या चोरापर्यंत पोहोचण्याची पोलिसांची तयारी असताना कोणत्याही चोरीत घडला नाही तसा प्रकार घडला. या चोरट्याने आकेल्ला यांच्या घरून लंपास केलेला सर्वच मुद्देमाल जसाचा तसास कुठलाही खर्च न करता तो एका प्लास्टिकच्या पिशवीत बांधून त्यांच्या घराच्या अंगणात टाकला. यामुळे सारेच अवाक् झाले. याची माहिती आकेल्ला यांनी शहर पोलिसांना दिली. माहिती मिळताच पोलिसांनीही तोंडात बोटे घातली. त्यांनी घटनास्थळ गाठून पाहणी केली. चोरीच्या मुद्देमालावर असलेले चोरट्याचे ठसे मिळविण्याकरिता ठसे तज्ज्ञांना पाचारण करण्यात आले होते. कारवाई करून पोलिसांनी सदर ऐवज आपल्या ताब्यात घेतला.
घटनेच्या सात दिवसानंतर चोरट्याने चोरी केलेला ऐवज जसाचा तसा तेवढाच त्या घरात आणून टाकल्याने यात काही वेगळाच संशय निर्माण होत आहे. ही चोरी करणारा चोरटा याच परिसरातील असावा, असा संशय बळावत असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. त्याने ऐवज घरात आणून टाकल्याने तो लवकरच पोलिसांच्या हाती येईल, असे स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक महेश चाटे यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.(प्रतिनिधी)