या चिमुकल्यांनो परत फिरा रे...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 8, 2019 02:27 PM2019-08-08T14:27:42+5:302019-08-08T14:35:43+5:30

वर्धा जिल्हा परिषद शाळेतील तंत्रस्नेही शिक्षक आणि विविध उपक्रमांच्या बळावर कॉन्व्हेट संस्कृतीच्या प्रेमात पडलेले दहा विद्यार्थी आता आपल्या पहिल्याच शाळेत परत आले आहेत.

These little ones are back ... | या चिमुकल्यांनो परत फिरा रे...

या चिमुकल्यांनो परत फिरा रे...

Next
ठळक मुद्देझेडपीच्या शाळेचे रूपडे पालटलेकॉन्व्हेंटच्या दहा विद्यार्थ्यांनी घेतला प्रवेश

आनंद इंगोले ।
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : पालकांना असलेली कॉन्व्हेट संस्कृतीची ओढ मुलांना मराठी शाळांपासून दूर सारत आहे. त्यामुळे पटसंख्या टिकविण्याचे मोठे आव्हान शिक्षकांपुढे उभे ठाकल्याने काही शाळा बंद करण्याची वेळ आली आहे. अशाही परिस्थितीत जिल्हा परिषद शाळेतील तंत्रस्नेही शिक्षक आणि विविध उपक्रमांच्या बळावर शाळेची गुणवत्ता सुधारली. याच परिवर्तनामुळे कधीकाळी कॉन्व्हेट संस्कृतीच्या प्रेमात पडलेले दहा विद्यार्थी आता आपल्या पहिल्याच शाळेत परत आले आहेत.
हिंगणघाट पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या कोल्ही या गावातील जिल्हा परिषदेची ही शाळा आहे. वर्धा आणि चंद्रपूर जिल्ह्याच्या सीमेवर अतिशय दुर्गम भागातील हे गाव आहे. या शाळेतील शिक्षक स्वयंप्रेरणेने विविध प्रयत्न करीत असल्याने या स्पर्धेच्या युगातही ही जिल्हा परिषदेची शाळा तग धरून आहे.
इतकेच नव्हे, तर मागील पाच ते सात वर्षांपासून जिल्ह्याच्या गुणवत्तेचे रूप संपूर्ण महाराष्ट्राला दाखविणारी एक आदर्श शाळा ठरली आहे. या शाळेमध्ये उत्कृष्ट हस्ताक्षर, ज्ञानरचनावादी व डिजिटल शिक्षण, नवोदय-शिष्यवृत्ती वर्ग, बागेतील उपक्रम, अस्खलिखित इंग्रजी बोलणारे आणि दोन्ही हातांनी लिहिणारे विद्यार्थी, ही या शाळेची विशेष ओळख आहे.
शाळेचे पालटलेले हे रूपडे अनेकांना खुणावत आहे. त्यामुळे यावर्षी या शाळेत चंद्रपूर व यवतमाळ जिल्ह्यातील कॉन्व्हेंटच्या विद्यार्थ्यांनी शाळेत प्रवेश घेतला आहे.
पटसंख्या टिकविण्यासाठी दाहीदिशा भटकंती करायच्या दिवसात या शाळेची पटसंख्या झपाट्याने वाढविण्यासाठी शाळेचे मुख्याध्यापक परमेश्वर नरवटे आणि सहाय्यक अध्यापिका दीपाली भापकर परिश्रम घेत आहेत.
शाळेसाठी गाव अन् गावासाठी शाळा
हिंगणघाट तालुक्यातील अतिदुर्गम भागातील या शाळेने शिक्षकांच्या कल्पकतेमुळे कात टाकली आहे. शाळा सुधारणेचे माध्यम ठरतात, याची प्रचिती या गावात आली आहे. शिक्षकांनी शाळेची स्थिती सुधारून आदर्श निर्माण करताच गावाकडे बघण्याच्या दृष्टिकोन बदलला. मान्यवरांच्या भेटीगाठी वाढल्या. त्यामुळे गावकऱ्यांनीही पुढाकार घेत या शिक्षकांच्या सहाय्याने गावात स्वच्छता अभियान व इतर उपक्रम राबवून चेहरामोहरा बदलविला. यावरून शाळेसाठी गाव अन् गावासाठी शाळा ही संकल्पना येथे पूर्णत्वास गेली आहे.
आमदारांनी शाळा घेतली दत्तक
मागील काही वर्षात या शाळेची पटसंख्या झपाट्याने वाढत आहे. सद्यस्थितीत शाळेपर्यंत पोहोचण्याकरिता रस्त्याची अडचण असल्याने अनेकांना त्रास सहन करावा लागत आहे. नजीकच्या शेकापूर येथील शाळेत पाचवा वर्ग नसल्याने विद्यार्थी कोल्हीच्या शाळेत प्रवेश घेऊ इच्छितात. पण, रस्त्याअभावी ते विद्यार्थी प्रवेशापासून वंचित राहत आहेत. याकरिता रस्त्याचे बांधकाम करण्याची गरज आहे.
हिंगणघाटचे आमदार समीर कुणावार यांनी या शाळेची भरारी पाहून त्यांच्या पंखात बळ भरण्यासाठी शाळा दत्तक घेतली. त्यामुळे या शाळेत आवश्यक असलेल्या सर्व साहित्याची पूर्तता ते करीत आहे. शेकापूर ते कोल्ही रस्ता मंजूर करून शाळा प्रवेशासाठी दारे खुली करून दिली आहेत.
येथील मुलांना कसे शिकविले जाते, शाळेचा परिसर कसा रंगविलेला आहे, एकच मुलगा दोन्ही हाताने एकाच वेळी कसा काय लिहू शकतो, हे जाणून घेण्यासाठी अनेकांनी आतापर्यंत या शाळेला भेटी दिल्या आहेत. अनेकांकडून या शाळेकरिता मदतीचा ओघही वाढला आहे.

गुणवत्तेसोबतच राबवत असलेले उपक्रम व त्याची युट्यूब, फेसबुक या सोशल मीडियाद्वारे केलेली प्रसिद्धी हे शाळेच्या यशाचे गमक आहे. शाळेला भेट देणाºया लोकांची संख्या वाढल्याने गावकºयांनी आपले गाव शंभर टक्के हागणदारीमुक्त करून इतर गावांसमोर आदर्श ठेवला आहे. शाळेला केंद्र प्रमुख विजया ढगे यांचे मार्गदर्शन तसेच आमदार समीर कुणावार यांचे सहकार्य मिळत आहे.
-दीपाली भापकर, सहाय्यक अध्यापिका, जि.प.शाळा,कोल्ही

Web Title: These little ones are back ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Schoolशाळा