जिल्ह्यात महासेतूमध्ये दरपत्रक लागणार
By Admin | Updated: February 15, 2016 02:14 IST2016-02-15T02:14:59+5:302016-02-15T02:14:59+5:30
जिल्ह्यात महासेतू कार्यालयात काही प्रमाणात दलालांचे बस्तान बसत असून सर्वसामान्यांना एकाच कामाकरिता विविध दर आकारण्यात येत आहे.

जिल्ह्यात महासेतूमध्ये दरपत्रक लागणार
जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश : ग्राहकांची होणारी फसवणूक थांबणार
वर्धा : जिल्ह्यात महासेतू कार्यालयात काही प्रमाणात दलालांचे बस्तान बसत असून सर्वसामान्यांना एकाच कामाकरिता विविध दर आकारण्यात येत आहे. यामुळे सर्वसामान्यांची फसगत होत आहे. याची माहिती जिल्हाधिकाऱ्यांना झाल्यानंतर त्यांनी प्रत्येक सेतू केंद्रात दरपत्रक लावण्याचे आदेश निर्गत केले. निवासी उपजिल्हाधिकाऱ्यांच्या स्वाक्षरीचे तत्सम पत्र प्रत्येक केंद्रात पोहोचले आहे.
जिल्ह्यात शासनाच्यावतीने महासेतू केंद्र देण्यात आले. जिल्ह्यातील गोरगरीब विद्यार्थी व शेतकरी जनतेची कामे लवकरात लवकर व कमी पैशात व्हावी, असा शासनाचा उद्देश होता; परंतु तसे न होता, महासेतूत गोरगरीब नागरिकांची आर्थिक लूट होताना दिसते. शासनाच्या दराप्रमाणे महासेतूत मिळकतीचे प्रमाणपत्र ३२ रुपये, जातीचे प्रमाणपत्र ६० रुपयांत तयार व्हायला पाहिजे. येथे तसे न होता व महासेतूत रेटबोर्ड नसल्यामुळे २०० रुपयांपासून ते ८०० रुपयांपर्यंत ग्राहकाला पैसे मोजावे लागत असल्याचे निदर्शनास आले. यामुळे जिल्हा प्रशासनाचे लक्ष वेधण्याकरिता येथील आप पार्टीच्यावतीने निवेदन सादर करण्यात आले. यावरून हा आदेश काढण्याम आल्याचे कळविण्यात आले आहे.