There were 40 active patients of corona in the district | जिल्ह्यात कोरोनाचे अ‍ॅक्टिव्ह रुग्ण झाले ४०

जिल्ह्यात कोरोनाचे अ‍ॅक्टिव्ह रुग्ण झाले ४०

ठळक मुद्दे३२५ व्यक्ती आसोलेशनमध्ये : ५,२४३ गृहविलगीकरणात

लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : मार्च महिन्यापासून तब्बल ५० दिवस कोरोना मुक्त असलेल्या वर्धा जिल्ह्यात आता कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. जिल्ह्यातील आर्वी शहर कोरोनाचे हॉटस्पॉट बनले असून जिल्ह्यात रविवारपर्यंत ४० कोरोना अ‍ॅक्टीव्ह रुग्णांची नोंद आरोग्य प्रशासनाने घेतली आहे. तर ३२५ व्यक्तींना आरोग्य प्रशासनाने आसोलेशनमध्ये ठेवले असून अजूनही ५ हजार २४३ व्यक्तींना गृहविलगीकरणात ठेवण्यात आले आहे.
रविवारी १६५ जणांचा कोरोना चाचणी अहवाल प्राप्त झाला. त्यात जिल्ह्यात १२ नवे कोरोना रुग्ण आढळून आले. १३७ रुग्णांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे. तर ३२५ रुग्ण आसोलेशनमध्ये असून रविवारी १४३ जणांचे स्त्राव नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले आहे. वर्धा जिल्हा प्रशासनाने जिल्हा कोरोना मुक्त करण्यासाठी विविध उपाययोजना हाती घेतल्या आहे. अ‍ॅन्टीजेन चाचणी करण्यावर भर दिला जात आहे. केंद्र सरकारने आता भाजी विक्रेते व दुकानदार यांच्या कोरोना चाचण्या करण्याचे आदेश दिले आहे. मात्र वर्धा जिल्हा प्रशासनाने यापूर्वीच आर्वीसाठी या योजनेची अंमलबजावणीही सुरू केली होती. त्यामुळे वर्धा जिल्हा प्रशासन देशातही कोरोना मुक्तीच्या दृष्टीकोनातून अग्रेसर कामगिरी करीत असल्याचे दिसून येत आहे.
आतापर्यंत जिल्ह्यात १० हजार २०४ स्त्राव नमुने कोरोना चाचणीसाठी पाठविण्यात आले होते. त्यापैकी ९ हजार ९५३ अहवाल प्राप्त झाले आहे. त्यातील ९ हजार ६१५ अहवाल निगेटिव्ह आलेत. जिल्ह्यात कोरोना बाधितांची संख्या २८६ असून रविवारी ६ जण कोरोनामुक्त झालेत. आतापर्यंत २३६ कोरोनामुक्त झाले असून ८ जणांचा कोरोनाने मृत्यू जिल्ह्यात झाला आहे. तर एक जण इतर आजाराने मरण पावला. जिल्ह्यात सध्या ४० अ‍ॅक्टीव्ह रुग्ण असून ७० हजार ९१२ गृहविलगीकरण करण्यात आले आहे.
सध्या ५ हजार २४३ जण गृह विलगीकरणात आहेत. तर २९१ संस्थात्मक विलगीकरणात आहे. जिल्ह्यातील कोरोनाचा अभ्यास करून त्याबाबत अहवाल तयार करण्याची जबाबदारी महात्मा गांधी आयुर्विज्ञान संस्थान सेवाग्राम यांच्याकडे देण्यात आली आहे. त्यासाठी ४ हजार किट उपलब्ध होणार असून २ हजार नागरिकांच्या रक्ताचे नमुने घेतले जाणार आहे. कोरोनाची सिरो सर्वेक्षण करणारा वर्धा हा राज्यातील पहिला जिल्हा असावा असे सांगण्यात आले आहे.

वर्धेकर बिनधास्तच!
वर्धा शहरासह संपूर्ण जिल्ह्यात कोरोनाबाधितांची संख्या दिवसागणिक वाढतच आहे. मात्र, वर्धेकरांसह प्रशासनातील अनेक अधिकारी कर्मचारी बिनधास्तच आहेत. अनेक जण अद्याप मूळ गावाहून ये-जा करीत कोरोना बाधितांच्या संख्येत भर घालत आहेत. यावर ना प्रशासनाचे ना संबंधित कार्यालयातील विभागप्रमुखाचे नियंत्रण आहे.

Web Title: There were 40 active patients of corona in the district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.