तुरीच्या भावात मोठी घट, डाळींच्या किंमती मात्र जैसे थे
By Admin | Updated: November 20, 2015 02:33 IST2015-11-20T02:33:35+5:302015-11-20T02:33:35+5:30
तूर, मूग, मसूर या व्दिदल धान्याच्या डाळीं १५० ते २०० रुपये प्रतिकिलोवर पोहोचल्या. त्यामुळे सामान्य जनतेतून महागाई विरोधात ओरड झाली.

तुरीच्या भावात मोठी घट, डाळींच्या किंमती मात्र जैसे थे
बाजारपेठेत तूर सहा हजार रुपयांवर : डाळीच्या दराने सर्वसामान्यांची मात्र दाणादाण
फनिंद्र रघाटाटे रोहणा
तूर, मूग, मसूर या व्दिदल धान्याच्या डाळीं १५० ते २०० रुपये प्रतिकिलोवर पोहोचल्या. त्यामुळे सामान्य जनतेतून महागाई विरोधात ओरड झाली. शासनाने कारवाई करीत साठेबाज व्यापाऱ्यांकडून डाळींचे साठे जप्त केले. परिणामी बाजारातील १४ हजार रुपये प्रति क्विंटल असलेली तूर आता ६ हजार रुपयांवर आली. पण डाळींचे भाव मात्र जैसे थे आहेत. ही विसंगती शासनाच्या महागाई कमी करण्याच्या प्रयत्नाला प्रभावहित ठरणारी असून सर्वसामान्यांच्या तोंडातील सणासुदीच्या काळात डाळींच्या पदार्थांची चव हिरावणारी ठरत आहे.
सन २०१४-१५ च्या खरीप हंगामातील शेतकऱ्यांची तूर फेब्रुवारी २०१५ या महिन्यापासून निघायला प्रारंभ झाला. आर्थिक अडचणीत असलेल्या शेतकऱ्यांनी तुरी निघाल्याबरोबर विक्रीस काढल्या. त्या काळात तुरीचे दर ४००० -६००० रुपये प्रति क्विंटल पर्यंत होते. या काळात तूर डाळीचे दर ७० ते ८० रुपयांदरम्यान होते. एप्रील- मे २०१५ ला महिन्यात शेतकऱ्यांचा हरभरा निघाला. त्याला प्रति क्विंटल ३००० पर्यंत दर मिळाले. चनाडाळ ४० ते ५० रुपये प्रतिकिलो होती.
मे २०१५ पर्यंत शेतकऱ्याजवळील तूर व चना व्यापाऱ्यांच्या गोदामात जमा झाला. लगेच जादूची कांडी फिरली अन् तुरीची किंमत दररोज प्रतिक्विंटल पाचशे रुपयांनी वाढत प्रतिक्विंटल १४ हजारांवर पोहोचली. तर चना ५००० रुपयांवर गेला. परिणामी बाजारात तूरडाळ २०० रुपये व चनाडाळ १४० रुपये प्रतिकिलो झाली. अर्थातच या सर्व भाववाढीचा फायदा व्यापाऱ्यांनी घेतला. शेतकरी मात्र या लाभापासून वंचितच राहिला. झालेली भाववाढ पाहून आपण आपले उत्पादन विनाकारण विकले म्हणून तो हळहळला.
डाळीतील सदर भाववाढीने सामान्य जनतेत असंतोष उफाळला. विरोधक आक्रमक झाले. शासनाने दखल घेत साठेबाजीमुळेच भाव वाढले म्हणून व्यापाऱ्यांच्या गोदामावर जप्तीची कारवाई करत लाखो क्विंटल डाळी जप्त केल्या. कारवाई होताच अल्पावधीतच तुरीचे भाव गडगडले. तूर ६००० रुपयांवर आली. चना ३५०० रुपयांचा आला. असे झाले तरी डाळीचे दर मात्र शंभराच्यावर कायम आहेत. मुख्यमंत्री डाळींचे भाव कमी झाले असे कितीही सांगत असेल तरी प्रत्यक्षात बाजारात उपरोक्त डाळीसह मूग व मसूर या डाळींचे भाव देखील कमी होण्याऐवजी वाढतच राहिले. याचा त्रास सर्वसामान्यांना सहन करावा लागत आहे.