कोल्हापुरी बंधाऱ्यात कधी पाणी साचलेच नाही

By Admin | Updated: June 14, 2016 01:39 IST2016-06-14T01:39:57+5:302016-06-14T01:39:57+5:30

पाणी अडवा पाणी जिरवा म्हणत शासनाच्यावतीने नदी, नाल्यांवर कोल्हापुरी बंधारे बांधण्यात आलेत. यावर

There is no water in Kolhapuri dam | कोल्हापुरी बंधाऱ्यात कधी पाणी साचलेच नाही

कोल्हापुरी बंधाऱ्यात कधी पाणी साचलेच नाही

विरूळ (आकाजी) : पाणी अडवा पाणी जिरवा म्हणत शासनाच्यावतीने नदी, नाल्यांवर कोल्हापुरी बंधारे बांधण्यात आलेत. यावर लाखो रुपयांचा खर्च करण्यात आला; पण सद्यस्थितीत या बंधाऱ्यांमध्ये पाण्याचा एक थेंबही अडत नसल्याचे चित्र आहे. यामुळे ते कोल्हापुरी बंधारे कुचकामी ठरत आहेत.
सध्या सिंचनाची सुविधा व्हावी म्हणून शासनाच्यावतीने नव्याने जलयुक्त शिवार अभियान राबविण्यात येत आहे. तयार असलेल्या या कोल्हापुरी बंधाऱ्याला जलयुक्त शिवार अभियानात पुन्हा जिवंत केल्यास त्याचा लाभ त्या भागातील शेतकऱ्यांना होऊ शकतो, असे बोलले जात आहे. याचा विचार जलयुक्त शिवार अभियान राबविणाऱ्या यंत्रणेने करणे गरजेचे आहे. तत्सम मागणीही शेतकरी करीत आहेत; पण याकडेही दुर्लक्षच होताना दिसून येत आहे.
पाणी अडवा पाणी जिरवा या योजनेंतर्गत तालुक्यात अनेक ठिकाणी बंधारे बांधण्यात आले. नदी, नाल्या लगतच्या शेतकऱ्यांना पाणी मिळावे, परिसरातील भूजल पातळी वाढावी, शेतकऱ्यांच्या पिकांचा, गुरांच्या पाण्याचा प्रश्न मिटावा यासाठी नदी वा नाल्याच्या पात्रात कोल्हापुरी बंधारे बांधण्याची योजना होती. या योजनेत तालुक्यात अनेक ठिकाणी कोल्हापुरी बंधाऱ्यांची निर्मिती करण्यात आली; पण या बंधाऱ्यात पाणी साठत नसल्याचे दिसते. यात संबंधित अधिकारी, कर्मचारी, कंत्राटदार यांच्या संगनमताने गैरव्यवहार झाल्याचे बोलले जाते. या प्रकरणी चौकशी करावी व बंधारे उपयोगी आणावेत, अशी मागणी होत आहे.(वार्ताहर)

तांत्रिक अडचणीमुळे बंधारे कुचकामी
४कृषी विभागाद्वारे बांधण्यात आलेल्या बंधाऱ्यात कोणत्याही तांत्रिक अभियंत्याचा सल्ला घेण्यात आला नाही. कोणत्याही सिमेंटच्या कामात तांत्रिक अभियंत्याची गरज असते. त्याचा सल्ला व देखरेखीत कामे करण्यात येत असतात; पण कृषी विभागाने बंधारे बांधताना तांत्रिक सल्लाच घेतला नाही. यामुळे बंधाऱ्याच्या बांधकामावरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. निकृष्ट दर्जाची काम झाल्याचा आरोपही शेतकरी करीत आहे. याकडे लक्ष देत चौकशी करावी, अशी मागणीही शेतकऱ्यांकडून करण्यात येत आहे.

Web Title: There is no water in Kolhapuri dam

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.