बाजार समितीत सोयाबीनचे शासकीय खरेदी केंद्र नाही
By Admin | Updated: October 29, 2016 00:53 IST2016-10-29T00:53:01+5:302016-10-29T00:53:01+5:30
दिवाळसण साजरा करण्याकरिता शेतकऱ्यांकडून शेतात निघालेले सोयाबीन वाहनात भरून थेट बाजारात आणण्यात येत आहे.

बाजार समितीत सोयाबीनचे शासकीय खरेदी केंद्र नाही
शेतकऱ्यांची लूट सुरूच : गरज नसताना मूग उडिदाचे खरेदी केंद्र; बाजारात आलेल्या सोयाबीनला हमीभावाचीही शाश्वती नाही
रूपेश खैरी वर्धा
दिवाळसण साजरा करण्याकरिता शेतकऱ्यांकडून शेतात निघालेले सोयाबीन वाहनात भरून थेट बाजारात आणण्यात येत आहे. कृषी उत्पन्न बाजार समितीत व्यापाऱ्यांकडून शेतकऱ्यांची लूट सुरू झाली असून हमीभावापेक्षा कमी दरात खरेदी होत आहे. असे असताना जिल्ह्यातील बाजार समितीत सोयाबीन खरेदीचे एकही शासकीय केंद्र सुरू झाले नाही. यामुळे शासनच शेतकऱ्यांची लूट करीत असल्याची ओरड होत आहे.
या उलट बाजारात येत नसलेल्या मुंग व उडीद खरेदीकरिता केंद्र सुरू झाले आहे. ज्या कृषी मालाची बाजारात आवक नाही, त्या वणाच्या खरेदीकरिता शासनाचे केंद्र सुरू झाले आहे. या केंद्रावर दिवसभर शासनाचा कर्मचारी बसून राहतो; मात्र त्याला एक दाणाही मिळत नाही; मात्र गरज असताना शासनाच्यावतीने सोयाबीन खरेदीचे केंद्र सुरू करण्यात आले नाही. एकीकडे सोयाबीनची वाढती आवक व दुसरीकडे आवक नसलेल्या शेतमालाची खरेदी करण्याकरिता असलेले केंद्र, हा विरोधाभास शासनाच्या शेतकरी विरोधी धोरणाची आठवण देणारा ठरत आहे. यातच गत दोन दिवसांपूर्वी जिल्हाधिकाऱ्यांनी हमीदरापेक्षा कमी दरात सोयाबीनची खरेदी करू नये असे फर्माण काढले. बाजारात सध्या होत असलेली खरेदी व्यापाऱ्यांकडून होत असल्याने त्यांच्याकडून या फर्माणाकडे दुर्लक्ष होणे सहाजिकच आहे. दिवाळीसण दिवसावर आला आहे. यामुळे रात्रभर बाजारात शेतकऱ्यांच्या सोयाबीनची आवक सुरू आहे. यात सोयाबीन विकून मुला-बाळांना कपडे व घरी काही साहित्य नेण्याच्या इराद्याने शेतकरी बाजारात सोयाबीन आणतो; मात्र येथे त्याच्या लुटीमुळे या दोनपैकी एकच इच्छा पूर्ण करणे शक्य होत आहे. यामुळे निदान हमीभावाकरिता शासकीय खरेदीचे केंद्राची गरज आहे.
शेतकऱ्यांची दिवाळी अंधारातच
शेतकऱ्यांचा शेतमाल बाजारात येताच असलेला दर पडणे नित्याचेच झाले. यातच यंदा सोयाबीनचे उत्पन्न वाढणार असल्याचे संकेत आहे. यामुळे बाजारात आवक वाढत आहे. असे असले तरी यंदाची आवक आजच्या घडीला गतवर्षीच्या तुलनेत कमी असल्याचे दिसून आले आहे. यंदाच्या हंगामात गुरुवारपर्यंत २४ हजार क्विंटलची आवक झाली होती. गतवर्षी म्हणजेचे आॅक्टोबर २०१५ मध्ये २९ हजार ८७ क्विंटल सोयाबीन बाजारात आले होते. ही आवक यंदा वाढण्याचे संकेत आहेत.
गतवर्षी मिळाला होता ३,७९० रुपयांचा दर
गत वर्षी सोयाबीनचे उत्पन्न कमी झाल्याने शेतकऱ्यांना चांगला दर मिळाला होता. यंदा मात्र हमीभावापेक्षा शेतकऱ्यांना अत्यल्प दरात सोयाबीन विकावे लागत असल्याचे चित्र आहे. सन २०१५ च्या खरीप हंगामात ३ हजार ७९० रुपये प्रती क्विंटल दर मिळाला होता. तर यदांच्या हंगामात सरासरी २ हजार ८०० रुपयांचा दर मिळत आहे. यामुळे यंदाच्या हंगामात शेतकऱ्यांची दिवाळी अंधारात जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे.