रोगमुक्त करणारी दैवीशक्ती कुणातही नसते
By Admin | Updated: December 16, 2015 02:17 IST2015-12-16T02:17:20+5:302015-12-16T02:17:20+5:30
आपल्याला होणारे ५५ टक्के आजार हे मनोकायिक असतात. यातील काही आजार मंतरलेले पाणी, अंगारा खाल्ल्याने तात्पुरते बरे होतात.

रोगमुक्त करणारी दैवीशक्ती कुणातही नसते
पंकज वंजारे : रोठा येथे अंधश्रद्धा निर्मूलन कार्यक्रम
वर्र्धा : आपल्याला होणारे ५५ टक्के आजार हे मनोकायिक असतात. यातील काही आजार मंतरलेले पाणी, अंगारा खाल्ल्याने तात्पुरते बरे होतात. कायमस्वरुपी ते बरे होत नाहीत. तात्पुरता झालेला आराम हा रुणाने स्वत:ला दिलेल्या सूचनांचा मानसिक परिणाम असतो. रोग बरे करणारी दैवीशक्ती कुणातही नसते, अशी माहिती अखिल भारतीय अंनिसचे जिल्हा संघटक पंकज वंजारे यांनी दिली.
बहुचर्चित अन्नपूर्णामाता प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर रोठा येथे अ.भा. अंधश्रद्धा निर्मूलन समिती व संभाजी ब्रिगेडतर्फे भूत, करणी, जादूटोणा आणि जादूटोणाविरोधी कायदा या विषयावर आयोजित प्रबोधन कार्यक्रमात ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कामगार नेते भास्कर इथापे, तर अतिथी म्हणून सेवाग्रामचे सहायक पोलीस निलेश केळे, मराठा सेवा संघाचे जिल्हा सचिव सुधीर गिऱ्हे, संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष मंगेश विधळे, अ.भा. अंनिसचे तालुका सचिव संजय जवादे, उपसरपंच नरेश चौधरी, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक मुकेश अळसपुरे, दारुबंदी महिला मंडळाच्या अध्यक्ष जयश्री वाढोणकर, तंटामुक्त समितीचे अध्यक्ष सुभाष सोयाम आदी उपस्थित होते.
वंजारे म्हणाले, राष्ट्रसंतांनी ग्रामगीतेत ‘संत बिमारी बसविती, तरी बुवाचे प्राण का जाती’ जगी कोणीही ना मरती, ऐसे का होऊ नये? असा प्रश्न उपस्थित करीत रोग हे दैवीशक्ती नाही तर वैद्यकीय उपचाराने बरे होतात असे सांगितले आहे. भूत उतरविण्याच्या नावाखाली अमानुष मारहाण करणे अथवा तशी कृती करणे जादूटोणाविरोधी कायद्यांतर्गत गुन्हा ठरतो. यासाठी शिक्षेची तरतूद असल्यचेही वंजारे यांनी मार्गदर्शनात सांगितले.
प्रास्ताविक मंगेश विधळे यांनी केले. संचालन मंगेश गांडोळे यांनी केले. आभार अतुल शेंदरे यांनी मानले. आयोजनाकरिता मोहन राऊत, हरीश पातुरकर, मयूर अळसपुरे, केतन राऊत, रामू जामनकर, राजू बोरकर, आशिष कुऱ्हाटकर, प्रवीण राऊत, शंकर जालमकर, नरेश साळवे, श्रीकांत ठाकरे, समीर गावंडे, मनोज गावंडे, मंगेश खेलकर, उमेश भोयर, किशोर तिजारे, विठ्ठल झाडे, आशिष कोल्हे, विशाल चौधरी, कैलास धानफुले, पवन तळणकर, किटुकले आदींसह इतरही ग्रामस्थांनी सहकार्य केले.(शहर प्रतिनिधी)