प्रतिबंधात्मक उपाय करण्याची गरज
By Admin | Updated: September 14, 2014 00:08 IST2014-09-14T00:08:34+5:302014-09-14T00:08:34+5:30
सध्या कीटकजन्य आजाराचा पारेषण काळ सुरू आहे. पावसाळ्यात डासांमुळे प्रसार होणाऱ्या रुग्णांच्या संख्येत वाढ होत असते. वातावरणातील बदल, अनियमित पाऊस, पाण्याचे दुर्भिक्ष, वाढते शहरीकरण,

प्रतिबंधात्मक उपाय करण्याची गरज
वर्धा : सध्या कीटकजन्य आजाराचा पारेषण काळ सुरू आहे. पावसाळ्यात डासांमुळे प्रसार होणाऱ्या रुग्णांच्या संख्येत वाढ होत असते. वातावरणातील बदल, अनियमित पाऊस, पाण्याचे दुर्भिक्ष, वाढते शहरीकरण, यामुळे सद्यस्थितीत डेंग्यूसदृश्य रूग्ण संख्येत वाढ होत असल्याचे लक्षात येत आहे. त्यामुळे डेंग्यू आजार टाळण्याकरिता रोगाची लक्षणे जाणून घेणे व तो टाळण्याकरिता प्रतिबंधात्मक उपाय करणे गरजेचे आहे, असे आवाहन जिल्हा आरोग्य विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.
डेंग्यू ताप हा विशिष्ट विषाणूमुळे होतो. डेंग्यूचा प्रसार हा एडीस एजिप्टाय नावाच्या दुषित डासांमुळे होतो. हा डास दिवसा चावतो. एकाएकी तीव्र ताप, तीव्र डोकेदुखी, स्रायुदुखी, उलट्या होणे, अशक्तपणा, भूक मंदावणे, जास्त तहान लागणे, तोंडाला कोरड पडणे, तापामध्ये चढ उतार, अंगावर पुरळ येणे, त्वचेखाली रक्तस्त्राव होणे, रक्तमिश्रीत किंवा काळसर शौचास होणे, पोट दुखणे अशी लक्षणे डेंग्यू तापात दिसून येतात. या डासाची उत्पत्ती साठवलेल्या स्वच्छ पाण्यात होते. त्यामुळे रांजण, सिमेंटच्या टाक्या, इमारतीवरील टाक्या, यामध्ये साठलेले पाणी तसेच घरातील शोभेच्या कुंड्या, फुलदाण्या, कुलर्स इत्यादीमध्ये साठवलेले पाणी यामध्ये डास अंडी घालून अंड्याचे रूपांतर अळी व नंतर डासात होते. त्यामुळे साठलेले पाणी ८ दिवसापेक्षा जास्त ठेवू नये ही खबरदारी घेणे अत्यंत आवश्यक आहे. पाण्याची भांडी घट्ट झाकणाने झाकून ठेवणे किंवा कापडाने बांधून ठेवणे आवश्यक आहे. आठवड्यातून एकदा पाण्याची भांडी, सिमेंटच्या टाक्या इत्यादी घासून पुसून स्वच्छ कराव्यात. दुसऱ्या दिवशी पाणी भरावे. आठवड्यातून एक दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा असे आवाहन विभागाच्या वतीने करण्यात आले आहे. डासापासून वैयक्तिक सौरक्षणासाठी झोपताना नियमितपणे मच्छरदाण्याचा वापर करावा, डासांना पळविणाऱ्या अगरबत्ती, क्रिम, मॅट किंवा कॉईलचा वापरणे गरजेचे आहे. तसेच ताप आल्यानंतर रक्ताची तपासणी करणे गरजेचे आहे.
डेंग्यू आजारावर उपचारासाठी विशिष्ट औषधी उपलब्ध नसून अशा रूग्णास बाह्य लक्षणानुसार त्वरीत औषधोपचार करावा लागतो. जानेवारी पासून वर्धा जिल्ह्यात डेंग्यू करिता १९०९ रक्त जल नमुने तपासले असून त्यातील ७४ रक्त जल नमुने दुषित आढळून आलेले आहे. त्यामध्ये एक मृत्यू निश्चित झाला असून ४ संशयित डेंग्यू तापाने मृत्यू झालेले आहेत. परिसर स्वच्छ ठेवून डासांची उत्पत्ती होणार नाही याबाबतची काळजी घेण्याबाबतचे आवाहन पालकमंत्र्यांनी केले आहे. तसेच जिल्हाधिकारी यांनी सर्व सर्व विभागांना समन्वयाने डेंग्यू नियंत्रणाकरिता उपाय योजना राबविण्याबाबत निर्देश दिले आहेत. जिल्हा शल्य चिकित्सक, वर्धा यांनी नागरी भागात या उपाययोजना नगर परिषदेच्या समन्वयाने राबविण्याचे आवाहन केलेले आहे. जिल्हा आरोग्य अधिकारी व हिवताप अधिकारी यांनी ताप असल्यास त्वरीत नजिकच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात संपर्क साधण्याबाबत सुचित केले आहे.(शहर प्रतिनिधी)