ज्वारीपेक्षा कडब्याचा भाव अधिक
By Admin | Updated: November 27, 2015 02:19 IST2015-11-27T02:19:51+5:302015-11-27T02:19:51+5:30
पाऊस कमी आला किंवा जास्त आला तरी हमखास होणारे उत्पन्न म्हणून ज्वारीची ओळख आहे. मात्र जंगली श्वापदांच्या हैदोसामुळे ही ज्वारी जिल्ह्यातून हद्दपार होत आहे.

ज्वारीपेक्षा कडब्याचा भाव अधिक
पेरा घसरणीवरच : जंगली श्वापदांमुळे जिल्ह्यातून ज्वारी हद्दपार
वर्धा : पाऊस कमी आला किंवा जास्त आला तरी हमखास होणारे उत्पन्न म्हणून ज्वारीची ओळख आहे. मात्र जंगली श्वापदांच्या हैदोसामुळे ही ज्वारी जिल्ह्यातून हद्दपार होत आहे. वैरणाकरिता उपयोगी येत असलेली ज्वारी बाजारात चढ्या दरात विकत घ्यावी लागत आहे. आजघडीला बाजार समितीचा फेरफटका माारला तरी ती येथे ज्वारी विक्रीला आली नसल्याचे दिसून आले आहे.
एक क्विंटल ज्वारीला बाजारात १६०० ते २००० रुपये भाव मिळतो आहे. पण ज्वारीच्या धांड्यांची एक पेंडी ७ रुपयांच्या भावात विकली जाते. त्यामुळे हजार पेंड्यांकरिता ७ हजार रुपये मोजावे लागतात. हा भाव पाहिल्यावर ज्वारीपेक्षा वैरणाचा भाव अधिक असल्याचे दिसून आहे.
कृ षी विभागाच्या खरीप हंगाम नियोजनात ज्वारीच्या पिकाचे लागवड क्षेत्र पाच हजार हेक्टरच्या आसपास अपेक्षित धरले जायचे. दिवसागणिक या क्षेत्रामध्ये घट होत गेली. आजच्या स्थितीला जास्तीत केवळ एक हजार हेक्टर क्षेत्रातही ज्वारीची लागवड होत असल्याचे दिसून आले आहे.
पूर्वी जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात ज्वारीची पेरणी होत होती. आता तिची जागा हायब्रिडने घेतन्ली आहे. ज्वारीचा पेरा जिल्ह्यात वाढला. तेव्हा बाजारात ११०० रुपये क्विंटलचा भाव मिळायचा व उत्पन्नाचे प्रमाण एकरी १० क्विंटलच्या आसपास होते. १९९० नंतर जिल्ह्यात श्वापदांच्या हैदोसाला सुरुवात झाली. हळूहळू ज्वारीच्या पेऱ्याचे प्रमाण कमी होत गेले. परिणामी ज्वारीच्याा धांड्यांना वैरण म्हणून असलेली मागणी वाढली. ज्वारीपेक्षा वैरणाची किंमत अधिक झाली. १९९५ च्या दरम्यान २२०० रुपयात १ हजार पेंडी कडबा विकला जात होता. गुरांच्या पंसतीचे खाद्य म्हणून ज्वारीच्या कडब्याची ओळख असताना दुहेरी उत्पन्न ज्वारीतून पिकांतून मिळत होते. ज्वारी भाकरीकरिता तर कडबा गुरांकरिता असे समीकरण राहायचे. त्यामुळे प्रत्येक शेतकऱ्याच्या घरी बैलजोडीसह दुधाळू जनावरे होती. श्वापदांनी ज्वारीचा फडशा पाडायला प्रारंभ केल्याने ज्वारीच्या उत्पन्नात घट झाली.
जिल्ह्यात रोह्यांसह रानडुकरांची संख्या वाढली. ही दोन्ही श्वापद पिकांची सर्वाधिक नासाडी करणारे आहेत. जवारीचा धांडा गोड लागत असल्याने तो खाण्याकरिता रोही व डुक्कर याच शेतांमध्ये ठाण मांडायचे. तर पक्षी ज्वारीच्या कणसातील दाणे टिपून नुकसान करीत होते. सर्वांधिक नुकसान श्वापदांनी केल्यामुळे उत्पादन सतत घटत राहिले. रोही व डुक्कर पीक खाण्याऐवजी ते खाली पाडत असल्याने त्याचे नुकसान अधिक व्हायचे. यात नुसता वेळ जात असल्यामुळे शेतकऱ्यांनी ज्वारीकडे शेतकऱ्यांनी पाठ फिरविली. परिणामी असा झाला की बाजारपेठेत हायब्रिड ज्वारीचा भाव आज २ हजार रुपये क्विंटलच्या घरात पोहोचला तर भारी ज्वारीला ३ हजार ५०० रुपयांचा भाव मिळत आहे.
शहरातील गोपालकांना हिरव्या वैरणाची एक पेंडी १५ रुपयांची झाली आहे. म्हणजेच १५ हजार रुपयात १ हजार पेंड्या कडबा विकला जातो. ज्वारीपेक्षा वैरणाचा भाव आज अधिक झाला. जंगली श्वापदांमुळे जिल्ह्यातील असंख्य शेतकऱ्यांनी ज्वारीची लागवड बंद केली. म्हणूनच बाजार समित्यांमध्ये ज्वारीचे पांढरे शुभ्र बारिक दाणे विक्रीकरिता येत नसल्याचे वास्तव आहे. बाजार समित्यांमध्ये धान्य खरेदीचा शुभारंभ होऊन दोन महिन्यांचा कालखंड लोटला, पण एकाही ठिकाणी ५ क्विंटलपेक्षा जास्त ज्वारी विक्रीकरिता आली नाही. हे विदारक सत्य लक्षात घेऊन तरी कृती होणार काय, असा प्रश्न आहे.(प्रतिनिधी)