जीवनात यशस्वी होण्यासाठी ‘शॉर्टकट’ नकोच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 24, 2018 20:49 IST2018-03-24T20:49:50+5:302018-03-24T20:49:50+5:30
जीवनात यशस्वी होण्यासाठी कुठलाही शॉर्टकट न अवलंबिता, असेल त्या परिस्थितीत कठोर मेहनत, तीव्र इच्छाशक्ती व निश्चित धैर्य या त्रिसुत्रीवर जगातील कुठलेही यश निर्भेळपणे मिळविता येते, असे मत सि.ए. अभिजीत थोरात यांनी मांडले.

जीवनात यशस्वी होण्यासाठी ‘शॉर्टकट’ नकोच
आॅनलाईन लोकमत
वर्धा : जीवनात यशस्वी होण्यासाठी कुठलाही शॉर्टकट न अवलंबिता, असेल त्या परिस्थितीत कठोर मेहनत, तीव्र इच्छाशक्ती व निश्चित धैर्य या त्रिसुत्रीवर जगातील कुठलेही यश निर्भेळपणे मिळविता येते, असे मत सि.ए. अभिजीत थोरात यांनी मांडले.
शिववैभव सभागृहात आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. या कार्यक्रमात प्रोफेशनल टीचर्स असोसिएशनच्यावतीने वर्धा जिल्ह्यातील ७० शिक्षक वृंदांचा सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. सामाजिक क्षेत्रात काम करताना जगाच्या बोलण्याकडे लक्ष न देता व मनात कुठलीही लाज न बाळगता काम सुरू ठेवले तरच आपण समाजातील प्रत्येक वंचित घटकांसाठी कार्य करून त्यांचं आयुष्य बदलवून त्यांना मुख्य प्रवाहात आणू शकतो, असे मत अमरावतीच्या युवा समाजसेविका गुंजन गोळे यांनी व्यक्त केले. झोपडपट्टीत राहून अतिशय बिकट परिस्थितीवर मात करीत सी.ए. होणारा आणि पुन्हा झोपडपट्टीतील मुलांसाठी रचनात्मक काम उभे करणारा पुण्याचा अभिजीत थोरात आणि मतिमंद मुले व एड्सच्या रुग्णांना आपले घर आणि आयुष्य अर्पित करून काम करणारी अमरावतीची युवा समाजसेविका गुंजन गोळे या दोन्ही उत्तुंग व्यक्तिमत्त्व लाभलेल्या कर्तबगार लोकांच्या मुलाखती रविवारी शिववैभव सभागृहात पार पडल्यात.
भारत देश सध्या जगातला सगळ्यात जास्त युवाशक्ती लाभलेला देश असून आपल्याला खऱ्या अर्थाने देश घडवायचा असेल तर प्रत्येकाला प्रथम स्वत:मध्ये बदल घडवावा लागेल. याकरिता या प्रक्रियेत ज्यांनी अतिशय प्रतिकूल परिस्थितीतूनही खडतर मार्गाने पूढे जाऊन आपले आयुष्य बनविले व जे इतरांनाही त्याच मार्गावर नेण्यासाठी प्रयत्नशील आहेत, अशा लोकांच्या मार्गदर्शनाची गरज ओळखून आजच्या युवकांना प्रोत्साहित करण्यासाठी म्हणून सलाम जिंदगी कार्यक्रमांतर्गत या मुलाखतींचे आयोजन केल्याचे आपुलकी संस्था पुणेचे संस्थापक अभिजीत फाळके पाटील यांनी आपल्या प्रास्ताविकातून सांगितले.
या प्रकट मुलाखतीची प्रस्तुती व संकल्पना भूमिपुत्र संघर्ष वाहिनीच्या महिला आघाडी प्रमुख तेजस्वी बारब्दे पाटील यांनी मांडली. कार्यक्रमाला पाहुणे म्हणून किशोर माथनकर, बंडोपंत भुयार, प्रा. सुनील पिंपळकर, डॉ. राम पंचारिया यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी प्रवीण काटकर यांनी आपुलकी सामाजिक संस्थेच्या कार्यपद्धती विषयीची माहिती दिली.
कार्यक्रमाचे संचालन रितेश घोगरे यांनी केले तर उपस्थितांचे आभार योगेश घोगरे यांनी मानले. कार्यक्रमाकरिता अजय पहाडे, प्रशांत देशमुख, आशिष चव्हाण, नितीन गूल्हाने, विक्रम खडसे, स्वप्नील देशमुख, अनिकेत भोयर, श्रीकांत राऊत, अतुल पाळेकर, किशोर ठाकरे, सचिन घोडे, अतुल तिमांडे, गजु येवतकर, नंदू गावंडे, प्रशांत भोसले, संदीप शेळके, अनिल भोगे, राजू राठी, विवेक लोहकरे, प्रवीण पेठे यांनी सहकार्य केले.
या मुलाखतीला शहरातील विविध महाविद्यालयातील विद्यार्थ्यांची उपस्थिती होती. त्यांनी या युवकांकडून प्रेरणा मिळत असल्याच्या प्रतिक्रीया याप्रसंगी व्यक्त केल्यात. आपले ध्येय गाठण्याकरिता या युवकांनी केलेले परिश्रम गुरूकिल्लीचे काम करू शकते, अशाही प्रतिक्रीया काही युवकांनी याप्रसंगी व्यक्त केल्या.