मग, सर्वत्र दारूचा महापूर कसा!
By Admin | Updated: November 29, 2015 02:49 IST2015-11-29T02:49:46+5:302015-11-29T02:49:46+5:30
जिल्ह्यात पोलिसांकडून दारू पकडण्यात येत असल्याचे सांगण्यात येते. असे असताना जिल्ह्यातील प्रत्येक गावात दारूचे पाट वाहत आहेत.

मग, सर्वत्र दारूचा महापूर कसा!
दारूबंदी महामंडळाचा मोर्चा : पोलीस अधीक्षकांना महिलांचा थेट सवाल
वर्धा : जिल्ह्यात पोलिसांकडून दारू पकडण्यात येत असल्याचे सांगण्यात येते. असे असताना जिल्ह्यातील प्रत्येक गावात दारूचे पाट वाहत आहेत. जर पोलिसांच्यावतीने कारवाई होते तर मग, जिल्ह्यात दारूचा महापूर कसा, असा सवाल दारूबंदी महिला मंडळाच्या सदस्यांनी शनिवारी शहरातून काढलेल्या मोर्चातून थेट जिल्हा पोलीस अधीक्षकांना केला.
जिल्ह्यात दारूबंदी असताना दारूचा व्यवसाय तेजीत आहे. यामुळे अनेकांचे संसार उद्ध्वस्त झाले आहेत. शिवाय विषारी दारूच्या सेवनाने मृत्यू झाल्याची चर्चा आता जिल्ह्यात नित्याचीच झाली आहे. या प्रकाराकडे पोलीस विभागाचे लक्ष वेधण्याकरिता जिल्ह्यात एकूण १२ महिला दारूबंदी मंडळाच्या सदस्यांनी शहरातील शिवाजी चौक येथून मोर्चा काढला. हा मोर्चा मुख्य मार्गाने जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयाकडे पोहोचला. येथे मोर्चातील सदस्यांना न्यायालयाच्या मुख्यद्वाराजवळ अडविण्यात आले. मोर्चात सहभागी महिलांना किसान अधिकार अभियानचे मुख्य प्रेरक अविनाश काकडे, आम आदमी पार्टीचे मंगेश झाडे, सत्यशोशक महिला प्रबोधनिच्या प्रा. नुतन माळवी यांनी मार्गदर्शन केले.
शहरातून निघालेल्या या मोर्चात महिलांनी पोलीस प्रशासनाविरोधात अनेक घोषणा दिल्या. त्यांनी पोलिसांनी दारूविक्रेत्यांकडून हप्ते कमी करा, रेड अधिक करा, यासह अनेक नारे देत परिसर दणाणून सोडला. मोर्चा न्यायालयाच्या मुख्य द्वाराजवळ पोहोचला असता सहभागी महिलांना मार्गदर्शन करण्यात आले.
जिल्हा पोलीस अधीक्षक काही कारणास्तव बाहेर असल्याने वर्धेचे उपविभागीय पोलीस पोलीस अधिकारी संतोष वानखेडे यांनी मोर्चा थांबलेल्या स्थळी येत महिलांकडून विविध मागण्यांचे निवदेन स्वीकारले. यावेळी झालेल्या चर्चेच्यावेळी त्यांनी दारूबंदीकरिता विशेष मोहीम राबविण्याचे आश्वासन दिले. त्यांच्या आश्वासनावर हा मोर्चा विसर्जित झाला. (प्रतिनिधी)