दारिद्र्याच्या जाळीतच त्यांचे आयुष्य
By Admin | Updated: August 9, 2014 01:45 IST2014-08-09T01:45:14+5:302014-08-09T01:45:14+5:30
तळेगाव (श्या.पंत): पिढ्यान्पिढ्या प्रामाणिकपणे मासे पकडण्याचे काम करणारा विदर्भातील भोई समाज पराकोटीच्या दारिद्रयात जगत आहे.

दारिद्र्याच्या जाळीतच त्यांचे आयुष्य
तळेगाव (श्या.पंत): पिढ्यान्पिढ्या प्रामाणिकपणे मासे पकडण्याचे काम करणारा विदर्भातील भोई समाज पराकोटीच्या दारिद्रयात जगत आहे. नदीपात्रात मासे पकडण्यासाठी संपूर्ण आयुष्य जात असताना उद्याच्या पिढीला अनुसूचित जमातीच्या सवलती मिळणार कधी, असा प्रश्न या समाज बांधवांना पडला आहे.
बारा बलुतेदारानंतर अठरा अलुतेदारातील महत्त्वाचा घटक म्हणजे भोई समाज. या समाजाला इतिहास मोठा आहे. पूर्वीच्या काळी राजेवाड्यात पालखी वाहण्याचा मान भोई समाजाला होता. आजही अनेक राज्यात मंदिरातील पालखी भोई समाज बांधवांचा हात लागल्या शिवाय पुढे जात नाही. वेदकाळापासून स्वातंत्र्यपूर्व काळात लोकोपयोगी समाज म्हणून या जमातीकडे पाहिले आहेत. भोई जमात सांस्कृतिकदृष्ट्या आदिवासी असल्याचे सर्वेक्षणात आढळून आले आहे. भारतीय नागरिकत्व असताना एका राज्यात या समाजाला अनुसूचित जमातीच्या सवलती मिळतात तर दुसरीकडे नोकरी, शिक्षण क्षेत्रात टिकाव न लागणाऱ्या विमुक्त भटक्या जमातीच्या सवलती दिल्या जातात.
आज ओरिसा, बिहार, उत्तरप्रदेश, आंध्रप्रदेश या राज्यात या समाजाला अनुसुचित जमातीचे प्रमाणपत्र मिळते. परंतु महाराष्ट्रात हा समाज या सवलतीसाठी शासनाची पायरी झिझवत आहे. १९४७ नंतर भटक्या विमुक्त जमातीच्या सवलतीमिळूनही त्याचा लाभ मात्र मिळाला नाही.
भोई समाजाचा पारंपरिक व्यवसाय आज संकटात आला आहे. कमी पर्जन्यमानामुळे नदी-नाले तलावातील पाण्याची पातळी पूर्णत: घटली आहे. आर्थिक व शैक्षणिक दृष्ट्यामागास भोई समाज मासेमारीचा व्यवसाय करून जगत आहे. काही वर्षांपूर्वी गावाकडील नद्यांना बारमाही पाणी राहत असे. त्यावेळी मासेमारी व्यवसायातून उत्पन्न व्हायचे. आता तलाव, नदी कोरडे पडले आहे. त्यामुळे ग्रामीण भागात मासेमारी हा व्यवसाय डबघाईस आला आहे. पूर्वी या समाजातील व्यक्ती कापसापासून सूत करून त्यापासून मासळीचे जाळे विणण्याचे काम करीत होता. पकडलेले मासे ताजे रहावे यासाठी बांबूपासून तयार केलेली धुटी पाठीवर ठेवून त्यात मासे ठेवत असे. कालांतराने नायलॉनचे रेडीमेड महागडे जाळे बाजारपेठेत विक्रीस आल्याने जाळे विणण्याचे कामही बंद पडले आहे. या जाळ्यांच्या किमती अधिक असल्याने अडचण येते. या समाजामध्ये शिक्षणाचे प्रमाण अल्प असल्यामुळे बेरोजगारांची संख्याही वाढली आहे. जीवनमान उंचवण्यासाठी मत्स्य व्यवसाय संस्थेची निर्मिती झाली. परंतु पाणीच नसल्याने त्या कुचकामी ठरल्या आहेत. एकीकडे माशाला बाजारपेठेत चांगली मागणी आहे. तर दुसरीकडे या व्यवसायात कंत्राटदार मोठ्या प्रमाणात शिरल्याने या समाजावर उपासमारीची पाळी आली आहे. शासनाने या समाजाला सुविधा देण्याची मागणी होत आहे.(वार्ताहर)