दत्तपूर परिसरातून मातीची चोरी
By Admin | Updated: June 4, 2014 00:14 IST2014-06-04T00:14:26+5:302014-06-04T00:14:26+5:30
दत्तपूर येथील महारोगी सेवा समितीच्या मालकीच्या शेतातून नालवाडी, साटोडा, कारला परिसरातील चोरांनी माती व मुरूम चोरण्याचा सपाटा सुरू केला होता. याची माहिती संस्थेच्यावतीने जिल्हा प्रशासनाला देण्यात आली.

दत्तपूर परिसरातून मातीची चोरी
तहसीलदारांची कारवाई : चार बैलबंड्या पकडल्या; दंड वसूल
वर्धा : दत्तपूर येथील महारोगी सेवा समितीच्या मालकीच्या शेतातून नालवाडी, साटोडा, कारला परिसरातील चोरांनी माती व मुरूम चोरण्याचा सपाटा सुरू केला होता. याची माहिती संस्थेच्यावतीने जिल्हा प्रशासनाला देण्यात आली. यावरून तहसीलदारांनी कारवाई करीत चार बैलबंड्यांना माती चोरताना रंगेहात पकडले. त्यांना १२ हजार ८00 रुपयांचा दंड ठोठावण्यात आला.
संस्थेच्या शेतातून माती चोरून त्याची विक्री करण्यात येत असल्याचे अनेक वेळा समोर आले. याबाबत संस्थेने या माती चोरांना अडविण्याचा प्रयत्न केला.; परंतु हे लोक मारहाण करण्याकरिता धावून येतात. या मातीचोरांना अडविण्याचा प्रयत्न केला असता संस्थेच्या एका सुरक्षारक्षकास मारहाण करून जखमी करण्यात आले.
यामुळे संस्थेने या घटनेची तक्रार जिल्हाधिकारी, उपविभागीय अधिकारी, तहसीलदार व पोलीस ठाणे (सेवाग्राम) येथे दिली. यावर जिल्हाधिकार्यांच्या सूचनेनुसार वर्धेचे तहसीलदार राहुल सारंग यांनी कार्यवाही करीत चार बैलबंडी धारकांना महारोगी सेवा समितीच्या शेतातून माती चोरताना रंगेहाथ पकडले.
या कारवाईत मंगेश श्रीधर मते रा. कारला रोड, मोतीराम दादाजी भोयर रा. साटोडा, प्रवीण मारोती उके व सुमेध चतुर्धन उके दोन्ही रा. नालवाडी यांच्या माती व मुरूम भरलेल्या बैलगाड्या पकडून जप्त केल्या. त्यांना प्रत्येकी ३ हजार २00 रुपयांचा दंड ठोठावण्यात आला.
या कार्यात सेवाग्राम पोलीस ठाण्याचे कोळे, सहाय्यक पोलीस निरीक्षक नामदेव चाफले, पोलीस शिपाई पाटील यांच्या सहकार्याने मंडळ अधिकारी मसराम व नालवाडीचे तलाठी खडतकर यांनी जप्तीचे कार्य केले. या कार्यात महारोगी सेवा समितीच्या कार्यकर्त्यांनी सहकार्य केले.(प्रतिनिधी)