सागवान चोरी व शिकारीला ऊत
By Admin | Updated: September 9, 2014 00:34 IST2014-09-09T00:34:39+5:302014-09-09T00:34:39+5:30
कोट्यवधी रुपयांची वनसंपदा, वन्यप्राण्यांचा जीव सध्या दैवाच्या हवाली झाला आहे. वनाची रखवाली करणारे संपावर गेल्याने वनसंपदेचे संरक्षण करायला कुणी वालीच राहिला नसल्याचे दिसते.

सागवान चोरी व शिकारीला ऊत
आकोली : कोट्यवधी रुपयांची वनसंपदा, वन्यप्राण्यांचा जीव सध्या दैवाच्या हवाली झाला आहे. वनाची रखवाली करणारे संपावर गेल्याने वनसंपदेचे संरक्षण करायला कुणी वालीच राहिला नसल्याचे दिसते. परिणामी, बेसुमार जंगल तोडीसह शिकारीला ऊत आल्याचे चित्र परिसरात पाहावयास मिळत आहे.
हिंगणी व खरांगणा ही लगतची दोन वनपरिक्षेत्र सागवृक्षांसाठी प्रसिद्ध आहे. मौल्यवान साग वृक्षांसह बहुमूल्य वनौषधीचा ठेवा जंगलात आहे. पशु-पक्ष्यांचे माहेरघर असलेल्या या वनपरिक्षेत्रात जंगलराज सुरू आहे. दिवसाढवळ्या सागवृक्षांची कत्तल होत असल्याचे सध्या पाहायला मिळत आहे. आमगाव, रायपूर, रिधोरा, माळेगाव, बोरखेडी व आकोली परिसरात शिकारीला उधाण आल्याची स्थिती आहे. दररोज शिकारीच्या घटना घडताना दिसत आहेत. हरीण, मोर, ससा यांच्या जीवाला सर्वाधिक धोका निर्माण झाला आहे. उपवनसंरक्षक चव्हाण यांच्या काळात एवढ्या मोठ्या प्रमाणात जंगलात चोरीच्या घटना घडत नव्हत्या; पण सध्याचे चित्र पाहू जाता जंगलावर राज्य कुणाचे, असाच प्रश्न उपस्थित होत आहे.
काही वनमजूर आपली सेवा बजावत असले तरी काही मात्र जंगलाचे रक्षणकर्ते आहे की, चोरट्यांचे हे समजणे कठीण झाले आहे. एका वनमजुराची चोरटे व शिकारदाराशी सलगी असल्याचे बोलले जात आहे. याबाबत सर्वत्र चर्चाही सुरू आहे; पण वरिष्ठ अधिकारी याकडे दुर्लक्ष करीत असल्याचे दिसते. वन विभागातील कर्मचाऱ्यांच्या मागण्या अद्यापही शासनाने मान्य केलेल्या नाहीत. यामुळे संप सुरू असल्याने जंगलांकडे कुणाचेही लक्ष नसल्याने सर्वत्र आलबेल आहे.(वार्ताहर)