टॉकीजच्या जागेवर नाट्यगृह शक्य

By Admin | Updated: October 5, 2015 02:19 IST2015-10-05T02:19:42+5:302015-10-05T02:19:42+5:30

जिल्ह्यात नाट्यगृह नसल्यामुळे येथील कलाकारांना नाटकाची तालीम किंवा सादरीकरण करण्याकरिता अडचणीचा सामना करावा लागतो.

Theater can be made available in the place of talkies | टॉकीजच्या जागेवर नाट्यगृह शक्य

टॉकीजच्या जागेवर नाट्यगृह शक्य

पालकमंत्र्यांना निवेदन : रखडलेली कामे मार्गी लावण्याची केली मागणी
वर्धा : जिल्ह्यात नाट्यगृह नसल्यामुळे येथील कलाकारांना नाटकाची तालीम किंवा सादरीकरण करण्याकरिता अडचणीचा सामना करावा लागतो. वर्धा शहरातील वसंत टॉकीज बंद असून ही जागा सरकारी लीजवर आहे. टॉकीजच्या जागेवर नाट्यगृह उभारण्यात यावे, अशी मागणी भाजपच्या अनुसूचित जाती मोर्चाच्या शिष्टमंडळाच्यावतीने करण्यात आली.
यावेळी पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांना विविध मागण्यांचे निवेदन सादर करण्यात आले.
नाट्यगृह उभारण्याकरिता जिल्हाधिकारी यांना आदेश देण्यात यावे. येथे नाट्यगृह उभारल्यास जिल्हा वासियांना व कलाकारांना सुविधा उपलब्ध होईल. येथील कलाकार नाट्यगृहाअभावी कला सादरीकरणापासून वंचित राहतात. या निवेदनातून शहरातील प्रलंबीत प्रश्न सोडविण्याची मागणी करण्यात आली. यात शहरातील महावीर उद्यान आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर उद्यान यांची अत्यंत वाईट स्थिती आहे. या दोन्ही उद्यानाचे सौंदर्यीकरण करण्याचे काम रखडले आहे. निधी असताना प्रशासकीय अधिकारी यांचे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप निवेदनातून करण्यात आला. उद्यान सौंदर्यीकरण काम तात्काळ करण्याचे आदेश देण्याची मागणी केली.
शहरातील चौकात थोर महापुरुषांचे पुतळे बसविण्यात आले आहेत. मात्र सरदार वल्लभभाई पटेल, झाशीची राणी लक्ष्मीबाई यांचे पुतळे लहान आकारातील आहेत. हे दोन पुतळे शहराच्या मध्यवर्ती भागात आहेत. या दोन्ही पुतळ्याला पुर्णाकृती स्वरूप देण्याची मागणी करण्यात आली. तसेच या मार्गावर पटेल चौक ते लोकमान्य उपहारगृहापर्यंत गट्टू टाईल्स लावण्यात यावे. तसेच पथदिवे लावण्यात यावे, अशी मागणी केली.
जिल्हा क्रीडा संकुलाच्या देखभालीकडे दुर्लक्ष होत असल्याने मैदानावर खड्डे पडले आहे. मैदानावरील माती वाहुन गेली आहे. येथील प्रकाश व्यवस्था नाममात्र ठरत आहे. येथील लाईट अधिक काळ बंद असतात. याकडे लक्ष देत संबंधितांना सूचना देण्याची मागणी केली आहे. स्टेडीयमच्या परिसरात गाजर गवत मोठ्या प्रमाणात वाढले आहे. ते काढण्याकरिता सूचना देण्यात याव्यात. येथे एक फॉगींग मशीन दिल्यास खेळाडूंना मच्छर व किटक यांचा सराव करताना त्रास होणार नाही. तसेच रंगरंगोटी करण्याकरिता निधी उपलब्ध करुन देण्याची मागणी केली. यासह शहरातील प्रलंबीत मागण्यांकडे निवेदनातून लक्ष वेधण्यात आले. शिष्टमंडळाचे नेतृत्त्व भाजपच्या अनुसूचित जाती मोर्चाचे दिलीप ढोके यांनी केले.(स्थानिक प्रतिनिधी)

Web Title: Theater can be made available in the place of talkies

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.