चैतन्य जोशीलोकमत न्यूज नेटवर्क वर्धा : मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी मशिदींवरील भोंगे न हटविल्यास मशिदींसमोर हनुमान चालीसा लावणार असल्याचा इशारा दिला आहे. या पार्श्वभूमीवर वर्धा पोलीस दलही अधिक सतर्क झाले असून जिल्ह्यातील धार्मिक स्थळांवर करडी नजर ठेवून आहे. औरंगाबाद येथील सभेनंतर पोलीस यंत्रणा अलर्ट झाली आहे. तर दुसरीकडे राज ठाकरेंच्या अल्टिमेटमनंतर निर्माण होणारा संघर्ष टाळण्यासाठी तगडा बंदोबस्त लावण्यात आलेला आहे. विशेष म्हणजे मुस्लीम धर्मगुरूंनी पहाटे ५ वाजता भोंगे न वाजवता नमाज अदा करण्याचा निर्णय घेतला आहे. राज ठाकरे यांनी मशिदींवरील भोंगे न हटविल्यास मशिदींसमोर हनुमान चालीसा लावणार असल्याचे विधान केले. त्यानंतर या वक्तव्याचे राज्यभर पडसाद उमटले. काल २ रोजी औरंगाबाद येथे झालेल्या सभेतही त्यांनी अल्टिमेटम दिला. मात्र, सर्व धार्मिक स्थळांवर सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशान्वये ध्वनिक्षेपकाची परवानगी देण्यात आली आहे. तर दुसरीकडे राज ठाकरे यांनी कार्यकर्त्यांना बुधवार, ४ रोजीपासून मशिदींसमोर ध्वनिक्षेपक लावून हनुमान चालीसा वाचण्याचा अल्टिमेटम दिला आहे. या घोषणेनंतर पोलीस दल सज्ज झाले आहे. पोलीस दलाकडून शांतता व सुव्यस्था कायम राखण्यासाठी सर्व ठिकाणीच धार्मिक ठिकाणावर लक्ष केंद्रीत केले आहे.
सोशल मीडियावर ‘वॉच’- कायदा व सुव्यवस्था बिघडू नये, यासाठी सायबर सेलकडून सोशल कॅम्पेन राबविण्यात येत आहे. जाती, धर्माच्या भावना दुखवतील अशा पोस्ट, मजकूर सोशल मीडियावर व्हायरल केल्यास कारवाई करण्यात येणार आहे. तसेच सामाजिक सलोखा बिघडू नये, यासाठी पोलीस मित्रांची मदत घेतली जात आहे. आक्षेपार्ह पोस्ट दिसल्यास कडक कारवाईचे आदेश देण्यात आले आहेत.
१९ पोलीस ठाण्यांतील १८०० कर्मचारी तैनात - सामाजिक सलोखा बिघडू नये, यासाठी जिल्ह्यातील १९ पोलीस ठाण्यांतील अधिकारी, कर्मचाऱ्यांना सूचना देण्यात आल्या आहेत. धार्मिक स्थळांबाहेर पोलीस गस्त वाढविण्यात आली आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांसह सर्व पोलीस कर्मचारी कायदा व सुव्यवस्था बिघडू नये, यासाठी प्रयत्न करीत आहेत.
सर्वोच्च न्यायालयाच्या अधीन राहून जिल्ह्यातील सर्व धार्मिक स्थळांवर ध्वनिक्षेपक लावण्याची परवानगी देण्यात आलेली आहे. या निर्णयाचे कुणीही उल्लंघन केल्यास त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात येईल. - यशवंत सोळंकी, अप्पर पोलीस अधीक्षक, वर्धा