लोकमत न्यूज नेटवर्क वर्धा : सार्वजनिक वितरण व्यवस्थेद्वारे एपीएल, बीपीएस व प्राधान्य कुटुंबातील नागरिकांना दरमहा गहू व तांदळाचे वाटप केले जाते. यापूर्वी दोन रुपये किलो गहू व तीन रुपये किलो तांदूळ या दराने रेशन मिळत होते; पण आता मोफत धान्य पुरविले जात असल्याने लाभार्थीही या धान्याचा साठा करून फेरीवाल्यांना विकत असल्याचे वास्तव आहे. यामध्ये रेशनच्या तांदळाच्या बदल्यात दहा ते बारा रुपये किलोने पैसे दिले जात आहेत; परंतु गावागावात दक्षता समित्याच नसल्याने या रेशनच्या काळ्याबाजारावर अंकुश लावला जात नाही.
जिल्ह्यात अंत्योदय योजनेचे ५० हजार ३३७ कार्डधारक, तर १ लाख ७८ हजार ९६० लाभार्थी आहेत, तसेच प्राधान्य कुटुंबाचे २ लाख ४५ हजार ११५ कार्डधारक असून ९ लाख ५९ हजार ४१८ लाभार्थी आहेत. याशिवाय शेतकरी कुटुंब गटातील ७ हजार १० कार्डधारक असून २६ हजार ९०५ लाभार्थी आहेत. यात शेतकरी गट वगळता इतर सर्व रेशनकार्डधारकांना दरमहा मोफत धान्य पुरवठा केला जातो. धान्य गरजेपेक्षा जास्त झाल्याने अनेक लाभार्थ्यांकडून रेशनचे तांदूळ अन्य ठिकाणी विकल्या जात आहेत.
अशा ग्राहकांच्या शोधात गावागावांत काही विक्रेते वाहन घेऊन येतात व तांदळाच्या बदल्यात ज्वारी, साखर किंवा रोख रक्कम देतात. कुटुंबाला आवश्यकतेपेक्षा जास्त तांदूळ मिळत असल्याने वाया जाण्यापेक्षा विकलेला बरा, या हेतूने फेरीवाल्यांना विक्री होत असल्याचे दिसून येत आहे. याकडे मात्र पुरवठा विभागाचे फारसे लक्ष नसल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे रेशन धान्याची खुल्या बाजारात विक्री केली जात आहे.
रेशनवर कोणाला किती मिळतो तांदूळ? अंत्योदय कुटुंबातील शिधापत्रिकाधारकांना दरमहा ३५ किलो धान्य देण्यात येत आहे. यामध्ये २० किलो तांदूळ १५ किलो गव्हाचा समावेश आहे. याशिवाय प्राधान्य गटातील शिधापत्रिकाधारकांना प्रति सदस्य तीन किलो तांदूळ व दोन किलो गहू देण्यात येत आहे. या शिधापत्रिकाधा- रकांना दरमहा धान्य पुरवठा केला जातो.
शिवभोजन केंद्रावर रेशनचा तांदूळजिल्ह्यातील अनेक शिवभोजन केंद्रावर रेशनचा तांदूळ दिला जातो. रेशन दुका- नदारांशी साटेलोटे करून तांदूळ शिवभोजन केंद्रात कमी किमतीत दिला जातो. काही गावात स्थानिक दुकानदारही २० रुपये किलोप्रमाणे विकत घेतात व ४० ते ४५ रुपये किलो रुपयांनी ग्राहकांना विक्री करीत असल्याचे दिसून येत आहे.
तांदळाच्या बदल्यात पैसे, गावागावांत रॅकेट सक्रियरेशनचा तांदूळ खरेदी करणारे गावात एका ठिकाणी वाहन उभे करतात व नागरिकांच्या घरचा रेशनचा तांदूळ खरेदी करतात किंवा रेशनच्या धान्याच्या बदल्यात त्यांच्याजवळील ज्वारी किंवा साखर त्यांना देतात.
काळाबाजार होऊ नये म्हणून 'दक्षता' रेशनचा तांदूळ काळ्या बाजारात जाऊ नये म्हणून प्रत्येक गावात दक्षता समिती तयार करण्यात आली आहे. ही समिती काळ्या बाजारात जाणाऱ्या रेशनवर नियंत्रण ठेवत असते; पण सध्या ही समिती आहे की नाही, असा प्रश्न निर्माण होत आहे.
ग्रामसभेतून केली जाते निवड रेशनच्या काळ्या बाजारावर नियंत्रण ठेवण्यासाठी दक्षता समितीची ग्रामसभेतून निवड केली जाते. या समितीत गावातील निर्भीड व्यक्तीची अध्यक्षपदी निवड केली जाते. वर्धा जिल्ह्यात बहुतांश गावात दक्षात समितीच नसल्याचे सांगितले जात आहे.