शेतकऱ्यांचा तहसीलमध्ये ठिय्या

By Admin | Updated: June 20, 2015 02:27 IST2015-06-20T02:27:08+5:302015-06-20T02:27:08+5:30

वीरेंद्र चंपालाल संकलेचा नामक कापूस व्यापाऱ्याने शेतकऱ्यांचे सुमारे ३ कोटी रूपये न देता पळ काढला.

Thats in the tehsil of farmers | शेतकऱ्यांचा तहसीलमध्ये ठिय्या

शेतकऱ्यांचा तहसीलमध्ये ठिय्या

कापसाचे चुकारे घेऊन व्यापारी बेपत्ता प्रकरण : कोट्यवधी रुपयांचे नुकसान
आर्वी: वीरेंद्र चंपालाल संकलेचा नामक कापूस व्यापाऱ्याने शेतकऱ्यांचे सुमारे ३ कोटी रूपये न देता पळ काढला. जवळपास एक महिन्यापासून तो शेतकऱ्यांना भुलथापा देत होता. या प्रकरणाची तक्रार शेतकऱ्यांनी बाळा जगताप यांच्या उपस्थितीत १६ जून रोजी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापतीकडे व पोलीस ठाण्यात केली. त्यावेळी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापतीकडून स्वत: लक्ष घलणार असल्याचे आश्वासन दिले होते. परंतु तीन दिवस लोटूनही सभापतीकडून काहीच हालचाल झाली नसल्याने संतप्त शेतकऱ्यांनी शुक्रवारी तहसीलदार मनोहर चव्हाण यांच्या दालनात ठिय्या दिला.
वर्षभर घाम गाळून पिकवलेला माल विकून त्यातील काही पैसे पुढील वर्षाच्या कास्तकारीकरिता शेतकरी जपून ठेवतात. परंतु शहरातील वीरेंद्र चंपालाल संकलेचा नामक कापूस व्यापारी, रा. गणपती वॉर्ड, आर्वी याने शेतकऱ्यांचे सुमारे ३ कोटी रूपये बुडवून गावातून पळ काढला. त्यामुळे त्याला कापूस विकणाऱ्या शेतकऱ्यांवर उपासमारीची वेळ आलेली आहे. पेरणीचा वेळ असल्यामुळे लागणाऱ्या खर्चाकरिता अनेक शेतकऱ्यांनी वीरेंद्र संकलेचा नामक कापूस व्यापाऱ्याला उधारित कापूस विकला. खरेदी करतेवेळी २-३ दिवसांत पैसे देतो असे सांगत या व्यापाऱ्याने शेतकऱ्यांकडून कापूस खरेदी केला. दोन-तीन दिवसांनी जेव्हा शेतकरी संकलेचाकडे पैसे मागण्याकरिता गेले असता टाळाटाळा करीत सदर व्यापाऱ्याने महिनाभर वेळ मारून नेली. एक महिन्यानंतर जेव्हा शेतकरी पैशासाठी आक्रमक झाले त्यावेळी सदर व्यापाऱ्याने गावातून पळ काढला.
प्रकरणाची तक्रार शेतकऱ्यांनी बाळा जगताप यांच्या नेतृत्वात १६ जून २०१५ रोजी बाजार समितीच्या सभापातीकडे व पोलीस स्टेशनला केली. परंतु तीन दिवस लोटूनही कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापतीकडून कुठलीही हालचाल नसल्याने संतप्त शेतकऱ्यांनी शुक्रवारी तहसीलदार मनोहर चव्हाण यांच्या दालनात ठिय्या दिला
तहसीलदार चव्हाण यांनी प्रकरणाचे गांभीर्य पाहून कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापतीला तहसील कार्यालयात बोलावून घेतले. तीन दिवस लोटूनसुद्धा आतापर्यंत कुठलीही कार्यवाही का केली नाही असा प्रश्न शेतकऱ्यांनी उपस्थित केला असता सभापतींनी उडवाउडवीची उत्तरे देत कोणत्याही परिस्थितीत सदर व्यापाऱ्याविरूद्ध पोलीसात तक्रार करतो असे आश्वासन दिले. परंतु जे काय करायचे आहे ते आमच्या समोरच करा असा पवित्रा बाळा जगताप यांनी घेत तहसीलदारांच्या दालनातील ठिय्या उठवून कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापतीच्या दालनात नव्याने ठिय्या दिला. वृत्त लिहेपर्यंत ठिय्या सुरूच होता. आंदोलनात धिरज पखाले, दामोधर उमेकर, सतीश बोरकर, सुधाकर तवणे, सुभाष लांडे, सचिन जुवारे, तुळशीराम तवणे, गणेश काळे, बंडू पखाले, राजेंद भुसारी, प्रभाकर खेडकर, गंभीरकर, शिरपूरकर, राजेंद्र गांडोळे, उत्तम कोल्हे, अनिल चव्हाण, काळे, सोनोने, घपाट, बाघळे, माहोरे, भोळे, अब्दुल फाजल, चाफले, लांडे, गोरडे, रांपले आदी शेतकरी उपस्थित होते.(तालुका प्रतिनिधी)
तत्काळ कारवाईची मागणी
या प्रकरणाला आता तीन दिवस लोटले आहे. परिसरातील शेतकऱ्यांचे जवळपास ३ कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे. असे असतानाही अद्याप कृउबा सभापती आणि तहसीलदारांनी यावर कुठलीही ठोस कारवाई न झाल्याने संतप्त शेतकऱ्यांनी सभापती आणि तहसीलदारांच्या कक्षात ठिय्या दिला.
पेरणीची वेळ असल्याने या पैशाचा कास्तकारांना आधार झाला असता. परंतु अशा प्रकारे लुबाडणूक झाल्याने शेतकरी हतबल झाले आहे.

Web Title: Thats in the tehsil of farmers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.