जिल्ह्यातील ५२१ पोलीस कर्मचाऱ्यांचे ठाणे बदल
By Admin | Updated: May 23, 2015 02:20 IST2015-05-23T02:20:23+5:302015-05-23T02:20:23+5:30
नवे पोलीस अधीक्षक रुजू होण्याच्या पूर्वसंध्येला जिल्ह्यातील ५२१ पोलीस कर्मचाऱ्यांच्या अंतर्गत बदल्यांचा पोळा फुटला.

जिल्ह्यातील ५२१ पोलीस कर्मचाऱ्यांचे ठाणे बदल
वर्धा : नवे पोलीस अधीक्षक रुजू होण्याच्या पूर्वसंध्येला जिल्ह्यातील ५२१ पोलीस कर्मचाऱ्यांच्या अंतर्गत बदल्यांचा पोळा फुटला. यामध्ये पाच वर्षांचा निकष लावण्यात आला आहे. जिल्ह्यातील १६ पोलीस ठाणे आणि विविध शाखांमधील पोलीस कर्मचाऱ्यांचा बदल्यांमध्ये समावेश आहे. काहींना त्यांची अडचण लक्षात घेऊन आहे तिथेच एक वर्षांची मुदतवाढ देण्यात आली आहे.
यामध्ये सर्वाधिक २०१ बदल्या पोलीस नाईक पदावरील कर्मचाऱ्याच्या झाल्या आहेत. यात १७८ पोलीस नाईक, आठ चालक पोलीस नाईक आणि २३ महिला पोलीस नाईकचा समावेश आहे. यातील २१ जणांना आहे तिथेच एक वर्षाची मुदतवाढ देण्यात आली आहे.
१७१ पोलीस हवालदार पदावरील कर्मचाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या. यामध्ये तब्बल १५१ पोलीस हवालदार, ११ चालक व ८ महिला कर्मचाऱ्यांचा समावेश आहेत. यामध्ये १३ जणांना आहे त्याच ठाण्यात एक वर्षाची मुदत वाढ देण्यात आली आहे.
पोलीस शिपाई पदाच्या ६३ बदल्यांमध्ये ३२ पोलीस शिपाई, तीन चालक पोलीस शिफाई व २८ महिला पोलीस शिपायांचा समावेश आहे. सहायक फौजदार पदाच्या एकूण ८६ बदल्या करण्यात आल्या. यात सात जणांना एक वर्षाची मुदतवाढ देण्यात आली आहे. यामध्ये १० जणांना एक वर्षाची त्याच ठाण्यात मुदतवाढ देण्यात आली आहे. यामध्ये ७० सहायक फौजदार, १३ चालक सहायक फौजदार आणि ३ महिला सहायक फौजदारांचा समावेश आहे.
महाराष्ट्र शासकीय कर्मचाऱ्यांचे बदल्यांचे विनियमन आणि शासकीय कर्तव्य पार पाडताना होणाऱ्या विलंबास प्रतिबंध अधिनियम २००५ मधील तरतुदी तसेच पोलीस महासंचालकांचे पत्राच्या आधारे आस्थापना मंडळाने छाननी अंती या बदल्या करण्यात आल्या आहेत.(जिल्हा प्रतिनिधी)
ंबदली आदेशावरुन असाही सूर
बदली आदेशावर प्रभारी पोलीस अधीक्षकांची स्वाक्षरी आहे. तसेच हे आदेश २० मे रोजी काढण्यात आले. वास्तविक, २१ मे रोजी अंकित गोयल यांनी पारस्कर यांच्याकडून पदभार स्वीकारला. एक दिवस उशिराने बदल्यांचा आदेश काढला असता तर त्यावर नव्या पोलीस अधीक्षकांची स्वाक्षरी असती, मग एक दिवसासाठी घाई का, असा सूर पोलीस विभागातील काही कर्मचाऱ्यांकडून काढला जात आहे.
काहींना पारदर्शकता पाळल्याचा आनंद
बदल्यांमध्ये काहींना मनाप्रमाणे ठाणी मिळाली नसल्यामुळे त्यांच्यात नाराजीचा सूर आहे, तर काहींना हवे असलेले ठाणे मिळाल्यामुळे त्यांच्या चेहऱ्यावर आनंद आहे. बदल्यावरुन काही पोलीस कर्मचाऱ्यांनी सदर बदल्या पारदर्शक झाल्या असून यामध्ये कर्मचाऱ्यांच्या अडीअडचणीही विचारात घेतल्याचे ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.