पंचायत समितीच्या शिक्षण विभागाचे छत कोसळले
By Admin | Updated: March 24, 2015 01:34 IST2015-03-24T01:34:47+5:302015-03-24T01:34:47+5:30
येथील पंचायत समितीच्या शिक्षण विभागाचे छत कोसळल्याने संगणकासह खुर्च्याचा चुराडा झाला.

पंचायत समितीच्या शिक्षण विभागाचे छत कोसळले
समुद्रपूर : येथील पंचायत समितीच्या शिक्षण विभागाचे छत कोसळल्याने संगणकासह खुर्च्याचा चुराडा झाला. रविवारी सुट्टी असल्यामुळे कर्मचारी नसल्याने मोठी जीवितहानी टळली. या प्रकारामुळे मात्र कर्मचाऱ्यांमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
पंचायत समितीच्या इमारतीला ५० वर्षांपेक्षा अधिक काळ झाला असून इमारत जिर्ण झाली आहे; मात्र प्रशासन त्याकडे लक्ष देत नाही. पाच महिन्यांपूर्वी सदर इमारतीमधील मनरेगा विभागातील छत पडून संगणक फुटले होते तर कृषी विभागातील सुद्धा छताचा काही भाग कोसळला होता. शिवाय शिक्षण विभागातील व्हरांड्यामधील छताचा काही भाग यापूर्वीच पडला. असे असताानाही वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याकडे लक्ष दिले नाही.
२२ मार्चला रविवार सुट्टीचा दिवस होता. सोमवारी सकाळी वरिष्ठ लिपिक माधव जुनघरे यांनी ९.३० वाजता कार्यालय उघडले असता त्यांना छताचा काही भाग पडलेला दिसला. त्यांनी पाहले असता त्यांच्या टेबलवर खुर्चीवर छताचा मोठा भाग पडलेला होता. त्यांच्या येण्यापूर्वी छत कोसळले असावे असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. कामकाजाच्यावेळी जर छत कोसळले असते तर मोठी जीवितहानी होण्याची शक्यता होती.
ज्या खुर्च्यावर छत कोसळले त्यावर शिक्षण विभागातील कनिष्ठ लिपिक सुयोग ठाकरे, वरिष्ठ लिपिक प्रशांत मंडपे, दिलीप सहारे, गटशिक्षणाधिकारी नासीर अहमद, कक्ष अधिकारी मधुकर रेडलावार बसतात. सदर कर्मचारी आपल्या तुटलेल्या खुर्च्या बघून धास्तावले आहेत. सदर घटनेमुळे पंचायत समिती मधील संपूर्ण कर्मचारी काम करीत असताना केव्हा आपल्यावर छत कोसळेल या भीतीने खुर्च्यावर बसायला तयार नाही व पंचायत समितीमध्ये कुठेही बसण्यासाठी जागा नाही. तेव्हा कृषी विभाग व शिक्षण विभागाला बचत भवन सभागृहामध्ये तात्पुरती जागा देण्यात आली आहे. सदर घटनेमध्ये संगणक खुर्च्या प्रिंटर असे दोन लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. एखाद्या कर्मचाऱ्याचा जीव गेल्याशिवाय वरिष्ठ प्रशासन लक्ष देणार नाही का, अशी प्रतिक्रिया व्यक्त होत आहे.(तालुका प्रतिनिधी)