वाघाने पाडला दहा शेळ्यांचा फडशा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 10, 2019 00:28 IST2019-02-10T00:27:40+5:302019-02-10T00:28:00+5:30
तालुक्यातील धामणगाव (गाठे) गावालगत असलेल्या गोठ्यात बांधून आलेल्या शेळ्यांवर पट्टेदार वाघाने हल्ला करून दहा बकऱ्यांना गतप्राण केले. तर एका बकरी गंभीर जखमी केल्याने शेळी पालकाचे सुमारे १.२० लाखांचे नुकसान झाले आहे.

वाघाने पाडला दहा शेळ्यांचा फडशा
लोकमत न्यूज नेटवर्क
समुद्रपूर/कोरा : तालुक्यातील धामणगाव (गाठे) गावालगत असलेल्या गोठ्यात बांधून आलेल्या शेळ्यांवर पट्टेदार वाघाने हल्ला करून दहा बकऱ्यांना गतप्राण केले. तर एका बकरी गंभीर जखमी केल्याने शेळी पालकाचे सुमारे १.२० लाखांचे नुकसान झाले आहे. या घटनेची नोंद वन विभागाने घेतली आहे. नुकसानग्रस्त शेळीपालकाला शासकीय मदत देण्यात यावी, अशी मागणी आहे. या घटना शनिवारी पहाटे घडली असून सदर घटनेमुळे ग्रामस्थांमध्ये वाघाची दहशत निर्माण झाली आहे.
प्राप्त माहितीनुसार, धामणगाव येथील शेतकरी वसंतराव आडे यांनी शेतीला पुरक व्यवसाय म्हणून शेळीपालनाची जोड दिली आहे. शुक्रवारी सायंकाळी उशीरा त्यांनी सर्व शेळ्या नेहमीप्रमाणे शेतातील गोठ्यात बांधून ते घराकडे परतले. परंतु, शनिवारी पहाटे याच शेळ्यांवर पट्टेदार वाघाने हल्ला चढवून दहा शेळ्यांना ठार करीत एका शेळीला गंभीर जखमी केले. तर पाच शेळ्यांनी वाघाच्या तावडीतून कसाबसा पळ काढल्याने त्या बचावल्या.
या घटनेमुळे शेतकरी आडे यांचे सुमारे १.२० लाखांचे नुकसान झाले असून त्यांना शासकीय मदतीची अपेक्षा आहे. घटनेची माहिती मिळताच वनविभागाचे सहवन परिक्षेत्र अधिकारी एच. एन. नरडंगे, वनरक्षक प्रिया सावरकर, वनमित्र प्रकाश सहारे यांनी घटनास्थळ गाठून पाहणी केली. शिवाय पंचनामा केला. पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. गायकवाड यांच्या प्रमुख उपस्थितीत मृत शेळ्यांचे शवविच्छेदन करण्यात आले. या घटनेची नोंद वन विभागाने घेतली आहे.
लोकप्रतिनिधींकडून नुकसानग्रस्तांचे सांत्वन
सदर घटनेची माहिती मिळताच जि.प. सदस्य रोषण चौके, पं.स. सदस्य वसंतराव घुमडे यांनी घटनास्थळ गाठून नुकसानग्रस्त शेतकऱ्याचे सांत्वन केले. शिवाय त्यांनी सदर नुकसानग्रस्त शेतकऱ्याला वन विभागाने तातडीने शासकीय मदत द्यावी, अशी मागणीही केली आहे.
घटनास्थळी बघ्यांची एकच गर्दी
वाघाने हल्ला करून दहा शेळ्यांना ठार केल्याच्या घटनेची वार्ता परिसरात वाऱ्यासारखी पसरल्याने घटनास्थळी बघ्यांची एकच गर्दी झाली होती. या घटनेमुळे धामणगावसह परिसरातील ग्रामस्थांमध्ये वाघाबाबत कमालीची दहशत निर्माण झाली असून वन्य प्राण्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी आहे.