लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : सेल्फी काढण्याचा मोह... आणि अचानक पाय घसरल्याने वाचवा... वाचवा... म्हणून कानी पडणारा आवाज... क्षणाचाही विलंब न करता मोठ्या बहादुरीने पाण्यात उडी घेत तिघांना वाचविण्यात यश मिळाले. पण, दोघांना वाचवू न शकल्याने निराशाही झाली. ही शौर्यगाथा आहे हर्षल कालभूत या युवकाची.तालुक्यातील धावसा येथे गुरुपौर्णिमेनिमित्त पाच मित्र तलावाकाठी सेल्फी काढत होते. अचानक त्यांचा पाय घसरून ते तलावातील पाण्यात पडले आणि गटांगळ्या खाऊ लागले.
आरडाओरडा एकू येताच हर्षल कालभूतने क्षणाचाही विलंब न करता पाण्यात उडी घेत उमंग राजू चौधरी, रोहीत वामन रबडे व गौरव राजेश तेलंगे यांना पाण्याबाहेर काढण्यात यश मिळवले.मात्र, तेजस चोपडे आणि हर्षल चौधरी यांना वाचविण्यात अपयश आल्याने निराश झाल्याची खंत हर्षल कालभूत याने व्यक्त केली.
हर्षल कालभूत हा धावसा येथील रहिवासी असून सोहमनाथ विद्यामंदिर उमरी येथे दहावीचे शिक्षण घेतो आहे. घरी दोन एकर कोरडवाहू शेती असून आई व वडिल शेतात मजूरी करतात. पडक्या घरात राहतात. मात्र, शासन दरबारी त्याच्या शौर्याची कुणीही दखल घेतली नाही. प्रत्येक तरुणाला प्रेरणादायी ठरणाऱ्या हर्षलच्या शौर्याचे सर्वस्तरातून कौतुक होत असून त्याला शौर्यपदक देऊन गौरविण्यात यावे, अशी जनसामान्यांची अपेक्षा आहे.
पाचही युवक शेजारच्या उमरी गावातील रहिवासी असून गुरूपौर्णिमेचे औचित्य साधून ते धावसा येथील देवी मंदिरात दर्शनाला आले होते. त्यांनी हर्षल कालभूत याला सोबत घेतले हर्षल नसता तर या पाचही युवकांना जीव गमवावा लागला असता तीन युवकांसाठी हर्षल संकटमोचक ठरला असून त्याच्या शौर्याची दखल घेण्याची मागणी होत आहे.