तहसीलदारांनी दिले मोका पाहणीचे आदेश
By Admin | Updated: October 23, 2016 02:27 IST2016-10-23T02:27:34+5:302016-10-23T02:27:34+5:30
मदनी येथील १७ शेतकऱ्यांची वहिवाटच बंद झाली होती. याबाबत ‘लोकमत’ने शनिवारी वृत्त प्रकाशित केले.

तहसीलदारांनी दिले मोका पाहणीचे आदेश
वृत्ताची दखल : मदनीच्या शेतकऱ्यांना रस्ता मिळण्याची अपेक्षा
आकोली : मदनी येथील १७ शेतकऱ्यांची वहिवाटच बंद झाली होती. याबाबत ‘लोकमत’ने शनिवारी वृत्त प्रकाशित केले. हे वृत्त उमटताच तहसीलदार डॉ. रवींद्र होळी यांनी मंडळ अधिकारी पी.एस. डेहणे यांना संयुक्त मोका पाहणी करण्याचे आदेश दिले. शिवाय शेतकऱ्यांना रस्ता उपलब्ध करून देण्याबाबत उपाययोजना करण्याचेही आदेशित केले आहे.
शनिवारी जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांचा सेलू तालुक्यातील तामसवाडा व बोरधरण येथे दौरा होता. यानिमित्त तहसीलदार डॉ. होळी काही वेळ आकोली येथील तलाठी कार्यालयात थांबले होते. याप्रसंगी मदनीचे वसंत दिघडे आणि इतर शेतकऱ्यांनी तहसीलदार डॉ. होळी यांची भेट घेतली. शेतकऱ्यांनी समस्या सांगितली असता त्यांनी मी ‘लोकमत’ चे वृत्त वाचले. मंडळ अधिकारी पी. एस. डेहणे यांना कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांना सोबत घेऊन संयुक्त मोका पाहणी करून त्वरित रस्ता उपलब्ध करून द्यावा. तसेच कायमस्वरूपी रस्त्याची उपाययोजना करावी, असा आदेश दिल्याचे सांगितले. याप्रसंगी मंडळ अधिकारी डेहणे, तलाठी मरस्कोल्हे, नासरे यांच्यासह शेतकरी व ग्रामस्थ उपस्थित होते.(वार्ताहर)