हळद सुकण्यापूर्वी युवकाचा मृत्यू

By Admin | Updated: May 3, 2015 01:48 IST2015-05-03T01:48:47+5:302015-05-03T01:48:47+5:30

युवकाने २४ एप्रिल रोजी विवाह उरकून पत्नीला घरी आणले़ संसाराची स्वप्ने रंगवीत असताना ..

Teens die before turmeric becomes dry | हळद सुकण्यापूर्वी युवकाचा मृत्यू

हळद सुकण्यापूर्वी युवकाचा मृत्यू

समुद्रपूर : युवकाने २४ एप्रिल रोजी विवाह उरकून पत्नीला घरी आणले़ संसाराची स्वप्ने रंगवीत असताना अंगाची हळद सुकण्यापूर्वीच त्याला मृत्यूने कवटाळले़ ही घटना किन्हाळा येथे शनिवारी सकाळी उघड झाली़ राहूल भास्कर गलांडे (२४) याचा शनिवारी सकाळी ९ वाजताच्या सुमारास नरेंद्र मोहरे यांच्या शेतातील विहिरीत मृतदेह आढळला़
राहूलच्या वडिलाचा आधीच मृत्यू झाला़ तेव्हा त्याची आई इंदूबाई भावाच्या छत्रछायेत किन्हाळा येथे राहू लागली. मामा वसंत बैलमारे यांच्या संस्कारात राहूल वाढला व जबाबदारी म्हणून पी.व्ही. टेक्सटाईल येथे काम करीत होता़ किन्हाळा येथेच लहान घर बांधून तो आई इंदूबाईसह राहत होता़ सर्व व्यवस्थित झाल्याने विवाहाचा विचार करीत पी.व्ही. टेक्सटाईल जाम येथेच कार्यरत विठ्ठल गायधने यांच्या मुलीशी लग्न ठरविले़ २४ एप्रिलला हळदगाव येथे प्रियंकाशी विवाह व २५ रोजी गावात स्वागत समारोहही झाला. आईच्या एकमेव मुलाचे लग्न व घरी नववधू आल्याने आनंदाचे वातावरण होते; पण यास काळाने घात केला़ लग्न होताच दोन वर्षांत पती गेला; पण मुलाकरिता ती सावरली होती़ अशातच ३० एप्रिल रोजी दुपारी ३.३० च्या सुमारास राहुल घरून निघून गेला. सर्वत्र तपास केला; पण पत्ता लागला नाही. शनिवारी नरेंद्र मोहरे शेतात गेले असता विहिरीत राहूलचा मृतदेह आढळला़ पोलिसांनी पंचनामा केला़ हळद सुकण्यापूर्वीच राहूलच्या मृत्यूने नववधूवर आघात झाला तर आई नि:शब्द झाली़ या घटनेमुळे हळहळ व्यक्त होत आहे़(तालुका प्रतिनिधी)

Web Title: Teens die before turmeric becomes dry

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.