बुटीबोरी-तुळजापूर मार्गाच्या ‘राज’मार्गात तांत्रिक विघ्न
By Admin | Updated: August 20, 2014 01:00 IST2014-08-20T01:00:14+5:302014-08-20T01:00:14+5:30
देवळी एमआयडीसीतील ७६५ के.व्ही. पॉवरग्रीडच्या लोकार्पणासह बुटीबोरी-तुळजापूर या मार्गाच्या चौपदरीकरणाचे भूमिपूजन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार अशी चर्चा असताना अचानक त्यांचा

बुटीबोरी-तुळजापूर मार्गाच्या ‘राज’मार्गात तांत्रिक विघ्न
चौपदरीकरणासाठी अभ्यास सुरू : पंतप्रधानांचा वर्धा दौरा रद्द होण्यामागे हेही कारण
राजेश भोजेकर - वर्धा
देवळी एमआयडीसीतील ७६५ के.व्ही. पॉवरग्रीडच्या लोकार्पणासह बुटीबोरी-तुळजापूर या मार्गाच्या चौपदरीकरणाचे भूमिपूजन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार अशी चर्चा असताना अचानक त्यांचा वर्धा दौरा रद्द झाला. वास्तविक, बुटीबोरी-तुळजापूर मार्ग हा महाराष्ट्र रस्ते विकास महामंडळाकडे (एमएसआरडीसी) असून तो भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणकडे (एनएचएआय) देण्यासाठी तांत्रिक अडचणी आहेत. त्या दूर होईपर्यंत चौपदरीकरणाचे भूमिपूजन दूरच असल्याची खळबळजनक माहिती पुढे आली आहे.
बुटीबोरी ते तुळजापूर या मार्गाच्या काही भागातील बांधकाम एमएसआरडीसीमार्फत पूर्ण करण्यात आले. ही लागत वसूल करण्यासाठी या मार्गावर एमएसआरडीसीतर्फे १० पथकर नाके उभारण्यात आले. टोल वसुलीवरुन झालेल्या आंदोलनानंतर राज्य शासनाने या मार्गावरील सर्व पथकर नाके बंद केले. एकाएकी वसुली थांबल्यामुळे एमएसआरडीसीला १८२५ कोटी रुपयांचा फटका बसला. ही रक्कम राज्य शासनाने द्यावी, असा महामंडळाचा तगादा आहे. ही बाबही या मार्गाच्या राजमार्गात अडचण ठरली आहे. दुसरी महत्त्वाची बाब म्हणजे हा मार्ग अद्याप एमएसआरडीसीकडेच आहे. या मार्गाचे राष्ट्रीय महामार्गात रुपांतर करण्यासाठी एनएचएआयमार्फत अभ्यास सुरू आहे. यानंतरच प्रकल्पाला अंतिम रुप देता येणार आहे. यासाठी किमान डिसेंबर महिन्यापर्यंतचा कालावधी लागेल, अशी माहिती खुद्द एनएचएआयच्या अधिकृत सूत्राने दिली. या मार्गाला राजमार्ग करण्याची प्रक्रियाच अद्याप अपूर्णावस्थेत असताना या मार्गाच्या चौपदरीकरणाचे भूमिपूजन करणे आततायीपणाचे ठरेल. इतकेच नव्हे, तर भूमिपूजन केल्यानंतरही लगेच बांधकाम करता येणार नाही, ही गंभीर बाबही ऐनवेळी पंतप्रधानांचा वर्धा दौरा रद्द करण्यात कारणीभूत ठरली, अशी माहिती संबंधित विभागाच्या अधिकृत सूत्राने नाव न छापण्याच्या अटीवर ‘लोकमत’ला दिली.