शिक्षण पध्दती मूल्यविहीन
By Admin | Updated: November 9, 2014 23:18 IST2014-11-09T23:18:58+5:302014-11-09T23:18:58+5:30
आजची शिक्षण पध्दती मुल्यविहीन असल्याने समाजातील युवक मोठ्या प्रमाणात व्यसनाधीन होत असून त्यांच्यात गुन्हेगारी प्रवृत्ती वाढत आहे. पूर्वी शिक्षणासह मुल्यांचे ज्ञान मिळत असे.

शिक्षण पध्दती मूल्यविहीन
समीर कुणावार : शिक्षण क्षेत्रातील विषयावर बैठक
हिंगणघाट : आजची शिक्षण पध्दती मुल्यविहीन असल्याने समाजातील युवक मोठ्या प्रमाणात व्यसनाधीन होत असून त्यांच्यात गुन्हेगारी प्रवृत्ती वाढत आहे. पूर्वी शिक्षणासह मुल्यांचे ज्ञान मिळत असे. समाजप्रबोधन करणाऱ्या संस्था मोजक्याच असून याची समाजाला गरज असल्याचे प्रतिपादन आ. समीर कुणावार यांनी केले.
विद्या भारती महाविद्यालयात विदर्भ प्रांत बैठकीच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर विद्याभारतीचे अ.भा. संघटन मंत्री काशीपती, प्रांताध्यक्ष प्रेमदास भाला, क्षेत्रीय उपाध्यक्ष सुधाकर रानडे आदी मान्यवर उपस्थित होते. पुढे बोलतांना आ. कुणावार म्हणाले, आजच्या शिक्षण प्रणालीचे व्यापारीकरण झाले आहे. सामान्य कुटूंबातील पालकांना त्यांच्या पाल्यांना उच्च शिक्षण देता येत नाही. शिक्षणातून संस्कार व मुल्य बेपत्ता झाले आहे, तरूण पिढी मुल्य विसरत चालली असून देशात वृध्दाश्रमांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. यास्थितीत समाजाला प्रेरणा मिळेल असे शिक्षण देण्याचा आशावाद त्यांनी व्यक्त केला. तसेच काशीपती यांनी पंडीत दिनदयाल उपाध्याय यांच्या एकात्मता मानव दर्शन व भारतीय संस्कृतीचा विचार यातून घेतलेल्या शिक्षण पध्दतीतून आदर्श समाजाची निर्मितीचा विश्वास व्यक्त केला. महेश सावंत यांनी या दोन दिवसीय बैठकीत शिक्षण क्षेत्रातील विषयांवर विचार मंथन होणार असल्याची माहिती दिली. प्रास्ताविक अविनाश नेवासकर यांनी केले. कल्पना मोरे यांनी उपस्थितांचे आभार मानले. (तालुका प्रतिनिधी)