शिक्षकांनी विद्यार्थ्यांमधील माणूस घडवावा
By Admin | Updated: October 4, 2016 01:45 IST2016-10-04T01:45:50+5:302016-10-04T01:45:50+5:30
आज जिल्हा परिषदेच्या शाळा चांगल्या होत आहेत. पण जनता अजूनही या शाळांमधील शिक्षणाच्या दर्जाकडे

शिक्षकांनी विद्यार्थ्यांमधील माणूस घडवावा
सुधीर मुनगंटीवार : जि.प. उत्कृष्ट शिक्षकांना पुरस्कार वितरण
वर्धा : आज जिल्हा परिषदेच्या शाळा चांगल्या होत आहेत. पण जनता अजूनही या शाळांमधील शिक्षणाच्या दर्जाकडे साशंकतेने पाहते. भौतिक सुविधा कितीही निर्माण केल्या तरी योग्य मनाची माणसं निर्माण करू शकलो नाही तर पुढची पिढी आपल्याला माफ करणार नाही. त्यामुळे शिक्षकांनी ट्रान्सफॉर्मरसारखे काम करावे. शिक्षकांनी दिलेल्या शिक्षणातून घडणारे विद्यार्थी हे जगाच्या पाठीवर दिव्यासारखे चमकले पाहिजे, असे प्रतिपादन राज्याचे वित्त, नियोजन व वनमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी रविवारी उत्कृष्ट शिक्षक पुरस्कार वितरण कार्यक्रमात केले.
जिल्हा परिषदेच्या सभागृहात आयोजित या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून जि. प. अध्यक्ष चित्रा रणनवरे, खा. रामदास तडस, आ. डॉ.पंकज भोयर, आ. समीर कुणावार, शिक्षण सभापती वसंत आंबटकर, महिला व बालकल्याण सभापती चेतना मानमोडे, कृषी व पशुसंवर्धन सभापती श्यामलता अग्रवाल, समाज कल्याण सभापती वसंत पाचाडे, मुख्य कार्यकारी अधिकारी नयना गुंडे व्यासपीठावर विराजमान होते.
यावेळी ना. मुनगंटीवार यांच्या हस्ते उत्कृष्ट राज्य शिक्षक पुरस्कारासाठी निवड झालेल्या यशवंत विद्यालयाच्या मुख्याध्यापिका रंजना दाते तसेच प्राथमिक शाळेच्या सहायक शिक्षका अर्चना देशकर यांचा शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. याशिवाय जिल्हास्तरीय उत्कृष्ट शिक्षक पुरस्कार प्राप्त सुनीता नगराळे, चंद्रशेखर भुजाडे, अजय रामटेके, प्रकाश घाटसावले, बंडू मडावी, मारूती विरूळकर, जयश्री तायडे, लक्ष्मण घारपुरे या शिक्षकांचा पालकमंत्र्याच्या हस्ते शाल श्रीफळ व सन्मानचिन्ह देऊन सपत्निक सत्कार करण्यात आला.
बोलताना पालकमंत्र्यांनी सर्व पुरस्कार प्राप्त शिक्षकांचे अभिनंदन केले. शिक्षकांनी त्यांच्या कर्तृत्त्वाने आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त केला आहे. त्यामुळे आता शिक्षकांना निरंतर चांगले काम करण्यासाठी उर्जा मिळेल. विद्यार्थ्यांना दहा पुस्तक वाचून जे ज्ञान मिळणार नाही, ते शिक्षकांच्या कृतीतून मिळावे, अशी अपेक्षा ना. मुनगंटीवार यांनी यावेळी व्यक्त केली. एक शिक्षक चुकला तर पुढच्या तीस पिढ्यांचे जीवन उद्ध्वस्त होते. शिक्षकांवर माणूस घडविण्याची मोठी जबाबदारी पूर्वापार चालत आली आहे. ही जबाबदारी शिक्षकांनी पेलावी, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.
खा. रामदास तडस यांनी गांधी फॉर टूमारो यासाठी पालकमंत्र्यांनी मान्यता देत मोठी रक्कम दिल्याबद्दल यावेळी आभार व्यक्त केले. जि.प. अध्यक्ष चित्रा रणनवरे यांनी पुरस्कार प्राप्त शिक्षकांचे अभिनंदन करीत शिक्षणाचा दर्जा सांभाळण्याचे आवाहन केले. आ. समीर कुणावार व डॉ. पंकज भोयर यांनी समायोचित मार्गदर्शन केले. आभार मुख्यकार्यकारी अधिकारी नयना गुंडे यांनी मानले. कार्यक्रमाला जिल्हा परिषदेच्या सर्व अधिकारी, कर्मचारी, शिक्षक, शिक्षिका उपस्थित होत्या.(प्रतिनिधी)
विकासाकरिता निधीची अडचण नाही
४वर्धा जिल्ह्याच्या विकासासाठी निधी कमी पडू देणार नाही. जगाला तत्वज्ञान देणारा सर्वोत्तम जिल्हा तयार करण्यासाठी कटीबद्ध आहे. वर्धेसाठी नाट्यगृह, अत्याधुनिक बसस्थानक, देवळीला स्टेडीयम तसेच लोअर वर्धा २०१७ पर्यंत पूर्ण करून शेतकऱ्यांना सिचंनासाठी पाणी देण्याचा संकल्प आहे. शेतकऱ्यांच्या आत्महत्या शून्यावर आणण्याचे आवाहन या सरकारने स्वीकारले आहे, असे प्रतिपादन ना. सुधीर मुनगंटीवार यांनी यावेळी केले.